कर्नाटकात नेतृत्व बदल नाही; मुख्यमंत्री येडियुरप्पांना अभय

बंगळुरू – गेले काही दिवस कर्नाटकात भाजप नेतृत्व बदल करणार अशी चर्चा होती. पण भाजपने त्यांना अभय दिल्याची चर्चा असून ते आपली उर्वरित टर्म पूर्ण करतील अशी स्पष्ट ग्वाही कर्नाटक प्रदेश भाजपचे अध्यक्ष नलिनकुमार कतील यांनी आज दिली.

ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाहीर वक्तव्य देणारे पर्यटन मंत्री सी. पी. योगीश्‍वर यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. कोणत्याही आमदारांनी पक्षविरोधी मोहिमांमध्ये सहभागी होऊ नये, अशी तंबीही त्यांनी दिली आहे. येडियुरप्पा हे भाजपचे एकमताने निवडले गेलेले नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात कोणताही बदल केला जाणार नाही असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही स्पष्ट केले आहे, अशी माहितीही प्रदेशाध्यक्षांनी दिली.

78 वर्षीय येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केला असून उर्वरित काळातही तेच मुख्यमंत्री असतील असेही त्यांनी निक्षुन सांगितले.