पुणे | कारखान्याला अभय देणाऱ्याची गय नाही

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- कुरकुंभ एमआयडीसीत छापा टाकून गुन्हे शाखेने मेफेड्रोन (एम. डी.) अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. येथून तब्बल साडेसहाशे किलो मेफेड्रोन जप्त केले. येथील निर्मिती केलेला माल थेट लंडनला जात होता. त्यामुळे एमआयडीसीतील कारखान्यांवर औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाने देखरेख ठेवणे आवश्‍यक होते, असे स्पष्ट मत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले. या कारखान्याला अभय देणारा कोणीही असो, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

अमितेश कुमार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी ड्रग फ्री माेहीम राबवली आहे. यामध्ये त्यांनी औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्न व औषध प्रशासनासही सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे त्यांचीही तितकीच जबाबदारी आहे. आम्ही कारखान्यावर छापा टाकताना गोपनीयता बाळगली होती. मात्र, कारवाईनंतर आम्ही औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाला विश्‍वासात घेतले आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देखरेख ठेवण्यास सांगितले आहे, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यालाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः बंद कारखान्यांवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

कुरकुंभ येथे आजवर चार वेळा छापे पडले असून, त्यामधून लाखो रुपयांचे एमडी विविध तपास यंत्रणांनी हस्तगत केले आहेत. दरम्यान, छापा टाकण्यात आलेल्या कारखान्यात दररोज किती उत्पादन होत होते, हेही तपासले जात आहे. याव्यतिरीक्त आणखी कोठून ड्रग सप्लाय होत आहे का, याचीही तपासणी केली जात आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ केम लॅबोरेटरीतून कोरोना आणि एचआयव्हीसंदर्भातील औषधे तयार करण्यात येत होती. या कारखान्याला विविध औषधे निर्मितीचे परवाने आहेत. या परवान्यांच्या आडून रॉ मटेरियल मागवून तेथे मेफेड्रोनची समांतर निर्मिती करण्यात येत होती.

मेफेड्रोनचे हैदर शेखच्या माध्यमातून वितरण
कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील अर्थ केम लॅबोरेटरीत तयार झालेले मेफेड्रोन या गुन्ह्यातील आरोपी हैदर शेखच्या माध्यमातून वितरीत होते. विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात ठेवलेले आणि अर्थ केममध्ये तयार होत असलेले मेफेड्रोन शेखने दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात दिली.

मेफेड्रोनच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत आवश्यक असलेल्या बाबींसाठी आरोपींना कोणी पैसे पुरवले, तसेच मेफेड्रोनच्या विक्रीतून आलेल्या पैशांचे आरोपींनी काय केले, याचा तपास पोलिस करीत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (४०, रा. सोमवार पेठ, खडीचे मैदान), अजय अमरनाथ करोसिया (३४, रा. भवानी पेठ) हैदर नूर शेख (४०, रा. विश्रांतवाडी), भीमाजी परशुराम साबळे (४६, रा. पिंपळे सौदागर, मूळ श्रीगोंदा), युवराज बब्रुवान भुजबळ (४१, रा. मरिबाचा वाडा, डोंबिवली) आणि आयुब अकबरशाहा मकानदार (४८, रा. कुपवाड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मकानदार याला गुरुवारी (ता. २२) अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा एकच्या अमली पदार्थविरोधी पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.