देशात विजेचा तुटवडा नाही – केंद्रीय ऊर्जामंत्री सिंह यांचा दावा

नवी दिल्ली – देशात विजेचा कसलाही तुटवडा निर्माण झालेला नाही, असा दावा केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी केला. विजेची टंचाई झाली असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र यात काही तथ्य नाही, असे सिंह यांनी सांगितले. त्याचबरोबर वितरण कंपन्यांनी विजेचे पैसे वीज निर्मात्या कंपन्यांना वेळेवर द्यावेत, असे आवाहन सिंह यांनी केले.

हरित ऊर्जेच्या विकास कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सिंह म्हणाले की, देशात विजेचा प्रश्न निर्माण होणार नाही. काल देशात कुठेही विजेची टंचाई आढळून आली नाही. काही ठिकाणी जर काही प्रश्न निर्माण झाला असेल तर तो राज्यांच्या अखत्यारीत निर्माण झालेला आहे, असे त्यांनी सांगितले.

देशातील वीज प्रकल्पांना कोळशाची कसलीही टंचाई नाही. सध्या या प्रकल्पाकडे तब्बल 80 लाख टन इतका कोळसा उपलब्ध आहे. या कोळशातून तयार झालेली वीज चार दिवस पुरेल इतकी आहे. दरम्यानच्या काळामध्ये आणखी कोळसा या वीज प्रकल्पाकडे पाठविण्यात येत असतो, असे त्यांनी सांगितले.

गेल्या महिन्यामध्ये कोळसा निर्माण करणाऱ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कोळशाचे उत्पादन कमी झाले होते. त्याचबरोबर कोळशाच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. देशांतर्गत कोळसा उपलब्ध असल्यामुळे आयात कमी करण्यात आली असल्यामुळे या पंधरवड्यात कोळशाचा प्रश्न निर्माण झाला होता.

मात्र वीज केंद्रांना कोळशाचा तुटवडा जाणवणार नाही. यासाठी इतर उद्योगांना देण्यात येणारा कोळसा काही काळ थांबविण्यात आलेला आहे. या उपाय योजनामुळे वीज टंचाईचे संकट देशासमोर निर्माण झाले नाही. आगामी काळातही अशा प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल इंडियाचे 16 हजार कोटी रुपये देणे बाकी आहे. त्याचबरोबर वीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे 75 हजार कोटी रुपये देणे बाकी आहे. या कंपन्यांना त्यांचा पैसा वेळेवर उपलब्ध झाला नाही तर कोळसा आणि वीज कशी निर्माण होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांनी हा पैसा योग्य वेळी या कंपन्यांना उपलब्ध करण्याची गरज असल्याचे सांगितले.