साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. लॉकडाउनमुळे हा उद्योग अडचणीत आल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे. साखर कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंनवर्षे साथ देत आलेत. तरी वाचवा??,असे म्हणत राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

२०१८-१९ आणि २०१९-२० पासून प्रलंबित असलेले निर्यात प्रोत्साहन भत्ते आणि बफर स्टॉक क्लिअरिंगच्या खर्चासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे केली होती. तसंच साखरेच्या हमीभावातही ग्रेडनिहाय वाढ करण्यात यावी. ती ३ हजार ४५० रूपयांपासून ३ हजार ७५० रूपयांपर्यंत असावी, गेल्या दोन वर्षांमध्ये गाळप केलेल्या ऊसाला सरासरी ६५० रूपये प्रतिटन अनुदानाची तरतूद करण्यात यावी, अशा मागण्याही त्यांनी पंतप्रधानांकडे केल्या होत्या.

खेळत्या भांडवाल्याच्या थकबाकीचे अल्पमुदतीच्या कर्जात रुपांतर करा, तसंच मित्रा समितीनं सुचवल्याप्रमाणे कर्जाच्या परतफेडीला दोन वर्षांची स्थगिती देत सर्व प्रकारच्या कर्जाची दहा वर्षांसाठी फेररचना करावी. साखर उद्योगांच्या डिस्टिलरीजना स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट आणि स्टँट अलोन बेसिसवर मानून बँकांनी २०१८ मध्ये केंद्र सरकारद्वारे घोषित करण्यात आलेल्या ‘लोन सब्वेंशन कॅम्पस स्कीम’नुसार इथेनॉल प्रकल्पांनाही आर्थिक सहाय्य केलं पाहिजे, असंही त्यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केलं होतं.

Leave a Comment