विरोधकांकडून चुकीचा प्रचार झाला, आपले कार्यकर्ते स्पष्टीकरण देण्यास कमी पडले

– दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले
मंचर –
देशात व राज्यात लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून चुकीचा प्रचार करण्यात आला. त्याचा परिणाम शिरूर लोकसभा मतदारसंघात झाला व निकाल बदलला. विरोधकांनी केलेल्या चुकीचा प्रचाराचे स्पष्टीकरण देण्यात आपल्या पक्षाचे कार्यकर्ते कमी पडले,असे म्हणत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव/ शिरूर यांच्या वतीने शनिवार, दि. ८ रोजी शिवगिरी मंगल कार्यालय मंचर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहविचार सभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी मंचर तालुका आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहविचार सभा शिवगिरी मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर चे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील,शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, प्रकाश पवार, केशर ताई पवार, राजेंद्र गावडे,सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले अनिल वाळुंज, अंकित जाधव, राजेंद्र गावडे, विश्वास कोह कडे, संजय गवारी ,केशर ताई पवार, शिवाजीराव ढोबळे, गणपतराव इंदोरे, बाबासाहेब खालकर, सचिन पानसरे, अंकित जाधव, सुषमाताई शिंदे, संतोष सैद यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी वळसे पाटील म्हणाले की, भाजपने घोषणा अबकी बार ४०० पार ही घोषणा केली. या घोषणेचा अर्थ वेगळा लावून वेगळा प्रचार करण्यात आला घटना बदलली जाणार, आदिवासी बांधवांचे आरक्षण जाणार, असे चित्र उभे करण्यात आले. मात्र, सरकार कुणाचेही असो घटना बदलली जाऊ शकत नाही. तसेच आरक्षणही बदलले जाऊ शकत नाही. मात्र, विरोधकांनी केलेल्या या प्रचाराला आपले कार्यकर्ते स्पष्टीकरण देण्यात कमी पडले. तसेच सोशल मीडियावरही कार्यकर्त्यांनी प्रचार केला नाही व याचा परिणाम आदिवासी बांधवांवर मोठ्या प्रमाणात झाला व निकाल वेगळे लागले.

लोकसभेला जरी वेगळा निकाल लागला असता तरी पुढील तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणूक आहे कार्यकर्त्यांनी शांत न बसता विधानसभेच्या तयारीला लागावे, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. तालुक्यात अनेक विकास कामे केली आहेत कोरोनाच्या काळात मंचर येथे मोठे कोविड सेंटर उभे करून लोकांचे प्राण वाचवले, अनेकांना दुर्मिळ औषधे उपलब्ध करून दिली त्याचबरोबर वैयक्तिक व सामाजिक कामे सुरू आहेत. तसेच नदीकाठच्या बागायती गावातून विरोधी उमेदवाराला अधिक मताधिक्य झाल्याने वळसे पाटलांनी नाराजी ही व्यक्त केली. तसेच समोरच्या बाजूने विधानसभेची तयारी चालू झाली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी गप्प बसू नये व कामाला लागावे असा सल्लाही वळसे पाटील यांनी दिला.

*सरकार शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक निर्णय घेणार – अतुल बेनके
यावेळी जुन्नरच्या आमदार अतुल बेनके म्हणाले की देशात आरक्षण बदलण्याची कोणाची हिंमत नाही व तसा प्रयत्न झाला तर मी, दिलीप वळसे पाटील प्रथम त्याला विरोध करू, पवार साहेब आमचे दैवतच आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र राज्याचे, तालुक्याचे प्रश्न अजित पवारच सोडवू शकतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर गेलो आहे. विरोधकांनी मुस्लिम समाजात वेगळी भावना निर्माण केल्याने लोकांची मानसिकता बदलली. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे चित्र बदलले तसेच चित्र राज्यात व देशात अनेक मतदारसंघात बदललेले पाहावयास मिळाले आहे. त्यामुळे आता महायुती व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध प्रश्न संदर्भात येणाऱ्या अधिवेशनात सरकार मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

*▪️माझ्या पराभवास मी जबाबदार – शिवाजी आढळराव पाटील*
शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेला माझा पराभवाबाबत मी कुणालाही दोष देणार नाही या पराभवास मी स्वतः जबाबदार असून कुठेतरी नियोजनात कमी पडलो म्हणून हा पराभव झाला आहे. मात्र, पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने काम सुरू करणार आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये भरपूर विकास कामे केली तरीही मतदान झाले नाही, ज्या ग्रामपंचायतींना निधी दिला त्यातील ८० % गावात मतदान कमी झाले पाच वर्ष जनतेसाठी काम केले. मात्र समोरचा उमेदवार कुठलेही काम न करता केवळ सहानुभूतीने निवडून येतो व मी पाच वर्ष काम करू नही मला सहानभूती मिळत नाही याचे आश्चर्य वाटते. शिरूर चा निकाल हा देशातील आगळावेगळा निकाल असल्याचे आढळराव पाटील म्हणाले तसेच अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांना जपणारे नेते असून कार्यकर्त्याच्या अडीअडचणीत धावून जाणे त्यांना कसा जीव लावावा हे अजित पवार यांच्याबरोबर काम करताना कळते तसेच वळसे पाटलांचा अपघात झाला नसता तर आज परिस्थिती वेगळी असती. रुग्णालयात भेटायला गेल्यानंतर ते मला नेहमी म्हणायचे की मी तुमच्याबरोबर नाही याचे वाईट वाटते मात्र ते प्रचारात असते तर आज निकाल वेगळा असता असेही आढळराव पाटील म्हणाले.यावेळी विष्णू काका हिंगे, माजी आमदार पोपटराव गावडे ,विठ्ठलराव भास्कर यांची भाषणे झाली. प्रास्ताविक निलेश थोरात यांनी तर आभार अंकित जाधव यांनी मानले.