पुणे जिल्हा | वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना आगामी काळात मोठी मागणी

लोणी काळभोर,(वार्ताहर) – सराव, कौशल्य व तंत्रज्ञान यांचा पाया भक्कम असलेला विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो. सध्या उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळात वाणिज्य विषयात प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे संधी उपलब्ध होत आहेत, असे मत सनदी लेखापाल राजेंद्र डांगे यांनी व्यक्त केले.

येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात वाणिज्य विभागामार्फत राजेंद्र डांगे यांचे सेमिनार ऑन आत्मनिर्भर करिअर ऑप्शन इन कॉमर्स अँड टॅक्सेशन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. पी. एम. खनुजा, प्रा. गणेश हजारे व महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.

राजेंद्र डांगे म्हणाले सध्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी स्वतःमध्ये कौशल्य असणे आवश्यक आहे. करियर निवडताना विविध गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे. या गोष्टींचा जीवनात उपयोग होतो. संधीचा फायदा घेण्यासाठी त्या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रॅक्टिकल स्किल्स, सॉफ्ट स्किल्स आणि तंत्रज्ञानाची जोड असेल तर तो विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो. सध्या उद्योगधंद्यांच्या मध्ये वाढ होत चाललेली आहे. त्यामध्ये वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना खूप संधी आहे.

प्राचार्य डॉ. मंजुळकर म्हणाले वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य अभ्यासले पाहिजे. संधीचे सोने करून घेतले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. खनुजा यांनी केले. सूत्रसंचालन तृप्ती जोशी तर प्रा. गणेश हजारे यांनी आभार मानले.