‘हे’ आहेत नशेच्या आजारावरील औषधोपचार, वाचा सविस्तर बातमी…

पुणे – व्यसनांशी लढा ही बाब म्हटलं तर सरळ साधी आणि म्हटलं तर खूप गुंतागुंतीची आहे. सरळ अशासाठी की नको असलेली घातक सवय सोडायची आणि पुन्हा व्यसनाच्या वाटेला जायचं नाही असं म्हटलं, की व्यसनाशी लढायची तयारी झाली असं म्हणता येतं. पण हे इतकं सोपंही नसतं. व्यसनी माणसाचं शरीर त्या व्यसनाच्या अधीन झालेलं असतं. शरीरात गुंतागुंतीचे रासायनिक बदल झालेले असतात.

मी व्यसनाशिवाय जगूच शकणार नाही, अशी मानसिकता तयार झालेली असते. शिवाय एखाद्याने व्यसन सोडायचं ठरवलं, तरी जवळच्या व्यक्‍तींचा, समाजाचा विश्‍वास परत मिळवणं खूपदा कठीण जातं. या सगळ्यांमुळे व्यसनमुक्‍ती ही बाब कॉम्प्लेक्‍स होऊन जाते. नुकत्याच होऊन गेलेल्या जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाच्या निमित्ताने तरुणाईला ग्रासणाऱ्या व्यसनांबाबत जागृती करण्याचा हा प्रयत्न…

यावर्षी अंमली पदार्थ विरोधी दिनावर मालवणी इथल्या विषारी दारू प्रकरणाचे सावट होते. या घटनेनंतर अनेक ठिकाणच्या छुप्या दारूभट्ट्या शोधल्या गेल्या. हजारो लिटर बेकायदा दारू नष्ट करण्यात आली. पण या भट्ट्या हे या समस्येचं मूळ नाही. कोणत्याही दुष्परिणामाची आणि मृत्यूचीही फिकीर विसरायला लावणारं बेलगाम व्यसन हा खरा प्रश्‍न आहे.

व्यसन म्हणजे काय?
व्यक्‍तीचे मन आणि विचार वास्तवापासून दूर नेणाऱ्या आणि एक विशिष्ट प्रकारची गुंगी किंवा नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याची सवय म्हणजे व्यसन असं म्हणता येईल. हे अंमली किंवा मादक पदार्थ व्यक्‍तीला एका आभासी जगात नेतात. मुळात नसलेले शौर्य, बेफिकीरी अशा भावना जाग्या करतात. त्यामुळे वास्तवाचे, परिस्थितीचे भान असताना आपण ज्या गोष्टी मोकळेपणाने बोलू किंवा करू शकणार नाही, अशा गोष्टी नशेच्या अंमलाखाली लोक करून जातात.

हे तात्पुरतं अवसान देणाऱ्या मादक पदार्थांमुळेच आपण हे करू शकतो असा एक ग्रह मनात तयार होतो. मग त्यांचं सेवन करण्याचं प्रमाणही वाढतं. मनावर असे परिणाम करणारे हे पदार्थ शरीराच्या सर्वसामान्य रासायनिक प्रक्रियांमध्येही ढवळाढवळ करतात. ठराविक वेळेला ते पदार्थ मिळाले नाहीत, तर बेचैनी वाढते, कशातही लक्ष लागत नाही. शरीरात त्या पदार्थाची तीव्र गरज निर्माण झाली असल्याचे संदेश मेंदूतून पोचवले जातात आणि व्यसनी व्यक्‍ती पुन्हा पुन्हा त्या पदार्थांकडे वळते. या अंमली पदार्थांवर असे पूर्ण अवलंबित्व येते, त्यावेळी ती व्यक्‍ती व्यसनाच्या आहारी गेली असं म्हटलं जातं.

व्यसन हा आजारच
कोणतेही व्यसन जडणे हे त्या व्यक्‍तीला एखादा आजार जडण्यासारखेच आहे. या आजाराचे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे कमकुवत मन आणि विचारशक्‍ती. त्यात आजूबाजूला घडणाऱ्या इतर कारणांची भर पडते आणि व्यसनाचा पहिला अनुभव घेतला जातो. शरीरही त्या पदार्थांना शरण जातं आणि त्या विशिष्ट रासायनिक द्रव्यावरचं अवलंबित्व वाढतं. ही केमिकल डिपेंडन्सी हे या आजारांचं स्वरूप म्हणता येईल. मेडिकल सायन्सच्या भाषेत हा आजार म्हणजे एक मनोकायिक विकृती आहे, म्हणजेच साकोसोमॅटिक डिसऑर्डर.

अंमली पदार्थांची उपलब्धता हा मोठा प्रश्न
अंमली पदार्थ किंवा ज्यांचे व्यसन लागू शकते असे पदार्थ कुठे उपलब्ध होतात, हे सर्वसामान्यांना कदाचित माहीत नसेल, पण व्यसनांमध्ये सापडलेली मुले- मुली हे पदार्थ कुठूनही मिळवतात. दारू किंवा सिगारेट तर सहज उपलब्ध होतातच. झोपेच्या गोळ्या घेऊन किंवा काही प्रमाणित औषधांच्या माध्यमातून नशा करणारी मुले सरळसरळ मेडिकल स्टोअर्समधून ही औषधे मिळवतात. त्यासाठी प्रिस्क्रिप्शन चोरणे, खोटी प्रिस्क्रिप्शन मिळवणे इथपासून ते चक्‍क स्वत: प्रिस्क्रिप्शन छापणे इथपर्यंत ही मुले जातात. कफ सिरप तर सहज कुठेही मिळू शकते. वेळेला हव्या असलेल्या ड्रगसाठी दुप्पट तिप्पट पैसेही मोजले जातात.

दुष्परिणाम
दारू किंवा सिगारेट आणि तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम जगजाहीर आहेतच. ड्रग्ज किंवा इतर व्यसनांमुळे होणारे परिणाम तर आणखी गंभीर असतात. शरीराची अन्नग्रहण करण्याची इच्छाच नाहीशी होते. त्यामुळे पोषण मिळत नाही. कुपोषणाची सगळी लक्षणे दिसतात. मानसिक आजार जडतात. पॅनक्रिआजच्या कर्यावर परिणाम होतो. मधुमेह जडतो. नजर कमी होते. मेमरी लॉस आणि मेंदूच्या इतर कार्यांवरही परिणाम होतो. त्वचाविकार होतात, फीटस येतात, किडनीवर परिणाम होतात. शरीराच्या सर्व महत्त्वाच्या यंत्रणांना नुकसान पोहचतं. व्यसनी व्यक्‍तीच्या लैंगिक जीवनावरही विपरित परिणाम होतात. षंढत्व येऊ शकतं. लैंगिक क्षमता नाहीशा होतात.

व्यसन मुक्‍तीसाठी
कोणालाही व्यसनापासून दूर करायचं असेल, तर त्या व्यक्‍तीची त्यासाठी मानसिक तयारी करून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. मुळात आपण एखाद्या गोष्टीवर अवलंबून आहोत, ही बाब व्यसनी व्यक्‍ती मान्यच करत नाही. आपण नशा का करतो, याची अनेक कारणे त्यांच्याकडे तयार असतात. परंतु , त्यांच्यावाचून आपले अडते हे त्यांना मान्य नसते. त्यामुळे त्यांना आपल्या व्यसनाचा एक आजार म्हणून स्वीकार करायला लावणे हा पहिला टप्पा ठरतो. त्यानंतर या आजारापासून मुक्‍त होणे हिताचे आणि गरजेचे आहे, हेही त्यांना पटवून द्यावे लागते.

या सुरुवातीच्या टप्प्यावर कौन्सिलिंग किंवा मानसोपचारतज्ज्ञाची मदत उपयोगी पडते. लक्षात घ्या, व्यसनी व्यक्‍ती अशी कौन्सिलरची मदत घेण्यासाठीही सहजासहजी तयार होत नाही. व्यसन ही व्याधी आहे, किंवा घातक आहे, हे इतरांना कळत असले, तरी व्यसनामुळे निर्माण झालेल्या भ्रामक मानसिकतेत त्या व्यक्‍तीसाठी व्यसन हा आनंद मिळवण्याचा एक मार्ग असतो. त्यांना त्यातून खोटे का होईना, पण मानसिक समाधान मिळत असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यसनापासून परावृत्त करणारी प्रत्येक व्यक्‍ती शत्रूप्रमाणे वाटते. त्यामुळे व्यसनमुक्‍तीसाठी करायच्या उपचारांमध्ये ही पहिली लढाई सर्वांत जिकीरीची ठरू शकते.

वेळीच ओळखा लक्षणे
आपल्या कुटुंबातील कुणी व्यसनांच्या आहारी जात आहे का, हे वेळीच ओळखणे महत्त्वाचे असते. अशा व्यक्‍तीच्या नेहमीच्या वागण्यात बदल होतात. ती तुटक वागायला लागते. आपल्याच कोशात असल्याप्रमाणे वागते. चिडचिड वाढते. ठराविक वेळी बाहेर जाते. ती वेळ टळून जायला लागली, तर अस्वस्थ होते. टॉयलेटमध्ये गरजेपेक्षा जास्त वेळ काढायला लागते. 

भूक मंदावते. जेवणाची, अंघोळीची टाळाटाळ करायला लागते. तिचा कामातील किंवा अभ्यासातील परफॉर्मन्स घसरतो. घरातून केली जाणारी पैशांची मागणी वाढते. खर्च वाढतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. झोप, जागरण आणि दिवसभराचं सगळं वेळापत्रक बिघडतं. ही किंवा यापैकी कोणतीही लक्षणे दिसली, तर त्या व्यक्‍तीकडे बारकाईने लक्ष देऊन ती कोणत्या व्यसनाच्या आहारी गेली आहे का, याचा शोध घेणं आवश्‍यक असतं.

असे जडते व्यसन
कोणतेही व्यसन लागण्यासाठी लाईफस्टाईल, कौटुंबिक स्थिती, वाढलेला ताण, पिअर प्रेशर किंवा मित्रांचा प्रभाव, एखादा मानसिक आघात किंवा समस्या पचवण्याची अक्षमता अशी अनेक कारणे असतात. हाय सोसायटी मॅनर्सच्या नावाखाली पार्ट्यांमध्ये घेतलेला एखादा पेग किंवा ड्रग्जचा एखादा डोस पुढे व्यसन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो. 

माध्यमांमधून सतत होणारी रेव्ह पार्ट्यांची, ड्रग्जच्या पार्ट्यांची चर्चा, फिल्म्स किंवा मालिकांमधून रोजच्या जगण्याचा भाग असल्याप्रमाणे दाखवले जाणारे पब्ज, डिस्को क्‍लब यांच्यामुळे कमी वयातल्या मुला-मुलींची उत्सुकता चाळवली जाते. हे काय असतं ते एकदा बघू तरी म्हणत उत्सुकतेपोटी व्यसनांकडे वळणारे आणि नंतर त्यात अडकत जाणारेही अनेकजण असतात. काहीजण मित्रांच्या नादाने किंवा आपण त्यांच्यात सामील झालो नाही, तर एकटे पडू या भीतीने व्यसनाधीन होत जातात. काही वेळा डिस्को किंवा पब मध्ये जाताना ड्रगचा एक जॉईंट मारू मग मस्त वाटतं, असं कुणीतरी सांगतं. त्या अनुभवाच्या मोहात पडून मुलं त्यात अडकत जातात. 

कुटुंबातील विसंवाद हे कारणही बऱ्यादा व्यसनांच्या मुळाशी असतं. आधी सांगितल्याप्रमाणे व्यसनाच्या आहारी जाणारी माणसं मुळातच मानसिक आणि भावनिक दृष्ट्या कमकुवत असतात. कुटुंबातील वातावरण खूप कडक असेल, मोकळा संवाद होत नसेल, मुलांवर कडक नियम किंवा अवास्तव अपेक्षा लादल्या जात असतील तर घरातल्या तरुण मुला-मुलींचा भावनिक कोंडमारा होतो. काही विषयांबद्दलची नैसर्गिक उत्सुकता विकृत स्वरूप घेते किंवा मुलं बंड करून उठतात आणि पालकांच्या विरोधात काहीतरी केलंच पाहिजे या भावनेतून व्यसनांच्या आहारी जातात. 

याउलट असणारं चित्र म्हणजे काही घरांमध्ये अति मोकळीक असते. मुलांच्या वागण्यांवर पालकांचे नियंत्रण नसते. त्यांना तेवढा वेळ नसतो किंवा त्यांचे मुलांवर लक्षही नसते. मुलांना फक्‍त हवा तेवढा पैसा पुरवला जातो. अशा स्थितीत पालकांना मुले व्यसनाधीन झाल्याचेही उशिरा लक्षात येते. एखाद्या वेळी परीक्षेतील अपयश, अपमान, मानसिक आघात, अपेक्षांचा आणि अभ्यासाचा ताण अशा कारणांनीही मुले व्यसनाधीन होताना दिसतात.

व्यसनावर औषधोपचार आहेत का?
या प्रश्‍नाचं उत्तर हो असं आहे; परंतु व्यसन हे कधीही न सांगता किंवा लपवून दिलेल्या औषधांनी सुटत नाही किंवा बरे होत नाही हे लक्षात ठेवा. याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीचे व्यसन वेगळे असू शकते. अंमली पदार्थाने शरीरात होणारे रासायनिक बदलही व्यक्‍तीनुसार वगवेगळे असतात. प्रत्येक व्यक्तीची बॉडी केमिस्ट्री वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाची औषधांची गरजही वेगवेगळी असू शकते. त्याचबरोबर व्यसन सोडण्यासाठी झालेली मानसिक तयारी या औषधोपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. 

म्हणूनच न सांगता व्यसन सोडवा, अशा प्रकारच्या जाहिरातींना बळी पडू नये हेच चांगले. व्यसन सोडवायचे असेल, तर तज्ज्ञांच्या मदतीने आणि व्यसनी व्यक्‍तीच्या सहमतीने योग्य औषधोपचार, वेळोवेळी समुपदेशन, भावनिक संतुलन आणि सहवासातील व्यक्‍तींचे सहकार्य असे एकत्रित प्रयत्न करावे लागतात.

दीर्घ प्रक्रिया
व्यसनमुक्‍ती ही कमीत कमी तीन महिने ते वर्षभर अशी दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. हा काळ प्रत्येकाच्या बाबतीत वेगळा असू शकतो. उपचारांदरम्यान विड्रॉवल सिम्प्टम्स जाणवतात. त्यांचा धीराने मुकाबला करावा लागतो. चक्‍कर येणे, भास होणे, नॉशिया, डोकेदुखी, हार्टबीट्‌स वाढणे, रक्‍तदाब वाढणे किंवा खूप कमी होणे, पोटात असह्य वेदना असे त्रास होऊ शकतात.

कित्येकांना रुग्णालयातही दाखल करावे लागते. या त्रासाला घाबरून रुग्ण पुन्हा व्यसनाकडे वळू शकतो. उपचारांदरम्यान व्यक्‍तीला व्यसनाच्या प्रभावातून बाहेर काढणाऱ्या औषधांची योजना करावी लागते. शरीरात साचलेली विषद्रव्ये बाहेर काढावी लागतात. शरीरयंत्रणांवर झालेला परिणाम कमी करून व्यसनांवरचे अवलंबित्व हळूहळू कमी करत नाहीसे करणे असे उपचारांचे भाग असतात. रुग्णाला मानसिक आधाराची सतत गरज भासते. मी व्यसनमुक्‍त होऊ शकतो, हा आत्मविश्‍वास निर्माण होण्याची गरज असते. तरी पुन्हा पुन्हा व्यसनांच्या वाटेकडे जाणाऱ्यांचे प्रमाण 90 टक्‍के आहे.

सामाजिक समरसतेची गरज
व्यसन हाही एक आजार आहे, असं कितीही म्हटलं, तरी व्यसनी व्यक्‍ती ही समाजासाठी उपद्रवकारक ठरत असते. त्यामुळे अगदी गंभीर आजाराच्या रुग्णांना मिळते, तशी समाजाची सहानुभूती या लोकांच्या वाट्याला येत नाही. त्यांचा काळा भूतकाळ, व्यसने पूर्ण करण्यासाठी केलेल्या चुकीच्या गोष्टी किंवा गुन्हे यांच्यामुळे व्यसन सुटल्यानंतरही समाज त्यांना स्वीकारत नाही. 

कित्येक वेळा कुटुंबीयही स्वीकारत नाहीत. या व्यक्‍ती व्यसनात गर्क असण्याच्या काळात त्यांच्या बरोबरीचे इतर लोक पुढे निघून गेलेले असतात. ही तफावत त्यांना टोचते. आर्थिक स्थिती खालावलेली असेल, तर पोट भरण्याचे इतर मार्ग लवकर उपलब्ध होत नाहीत. त्यांना काम देण्यासाठी कोणी तयार होत नाही. अशा स्थितीत या व्यक्‍ती पुन्हा कोषात जातात आणि त्यांचे व्यसन पुन्हा डोके वर काढते. हे होऊ द्यायचे नसेल, तर व्यसनमुक्‍तीसाठी प्रयत्न करणाऱ्या आणि उपचार घेणाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळण्याची संधी देण्याची गरज आहे. स्वीकार, विश्‍वास आणि सहकार्य यांच्या जोरावर व्यसनांची कीड नष्ट करायला मदत होईल. 

मुळात व्यसनांची कीड वाढू नये यासाठी शालेय अभ्यासात त्यांच्या दुष्परिणामांसंबंधी शिक्षण दिलं जावं. पालकांसाठी माहिती कार्यक्रम राबवले जावेत. व्यसनी व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी त्यांना झेपेल असं व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात यावं. त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करणंही जरूरी आहे. जबाबदारी टाकल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो आणि त्यांना व्यसनापासून दूर राहायला मदत होते.

दारू, तंबाखू आणि आणखीही बरेच
व्यसनाधीन व्यक्‍ती म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यांसमोर दारू किंवा अल्कोहोलच्या आहारी गेलेली माणसे येतात. दारूमुळे एक व्यक्‍तीच नाही, तर संपूर्ण कुटुंब बेचिराख होतं, याची अनेक उदाहरणे आहेत. तंबाखूचे व्यसनही असेच समाजाच्या सर्वथरांत पसरलेले दिसते. यात मशेरीपासून ते उंची सिगारपर्यंत सर्व प्रकार असतात आणि अंतिमत: त्याचे होणारे दुष्परिणामही सगळीकडे सारखेच असतात. 

दारूप्रमाणेच धूम्रपानाचे व्यसनही व्यसनी व्यक्‍तीबरोबर तिच्यासह राहणाऱ्या अन्य लोकांनाही त्रासदायक ठरते. पॅसिव्ह स्मोकिंगचे परिणाम प्रत्यक्ष धूम्रपानाइतके किंवा त्याहूनही भयंकर असतात. व्यसनांचा त्यापुढचा आणि कदाचित सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे ड्रग्ज. चरस, गांजा, मॉर्फिन, हेरॉईन, कोकेन, अफू, ब्राउन शुगर, मेफेड्रॉन, झोपेच्या गोळ्या, कफ सिरप, पेट्रोल, व्हाईटनर अशा असंख्य मार्गांनी हा नशेचा विळखा तरुणांना कमकुवत करताना दिसतो.

 

Leave a Comment