‘हे’ आहेत पृथ्वीच्या पाठीवरील धोकादायक ठिकाणे

पृथ्वीच्या पाठीवर अशी ठिकाणे देखील आहेत ज्या ठिकाणी पोहोचणे अशक्य आहे. एवढेच नव्हे तर अतिशय धोकादायक देखील आहेत. ही ठिकाणे लांबून पाहणे देखील श्वास रोखून धरायला लावण्यासारखे असते. पृथ्वीच्या पाठीवर सुंदर नद्या, हिरवेगार डोंगर, पर्वतराजी, समुद्री जीवन मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या ठिकाणचे सौंदर्य देखील अतिशय मनमोहक असेच असते. मात्र अशा या उंचीवरील ठिकाणांपासून ते खोल समुद्रापर्यंत पृथ्वीच्या पाठीवर दहा ठिकाणी अशी आहेत ज्या ठिकाणी पोहोचणे माणसासाठी धोकादायक ठरते. अमेरिकेतील ट्रॅव्हल ब्लॉगर ड्र बीन्सकी यांनी ही ठिकाणे सांगितलेली आहे.

१) एल केमिनेटो डेल रे – हे स्पेन मधील ठिकाण आहे. अतिशय उंचावर लोखंडाचा वापर करून उभारण्यात आलेल्या अरुंद अशा पदपथावरून चालण्याचा अनुभव हा श्वास रोखून धरणारा असाच ठरतो. स्पेन मधील गुदालहॉर्स या नदीवर उभ्या कातळाच्या कडेवर हा पदपथ 1900 साली बांधलेला आहे. या ठिकाणी असलेल्या जलविद्युत प्रकल्पापर्यंत कामगारांना जाता यावे यासाठी हा मार्ग बांधण्यात आला होता. या पदापथावरून जाताना अनेक जणांना जीव गमवावा लागल्याने अखेर 2000 साली हा पदपथ बंद करण्यात आला. या पदपथाचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आल्यानंतर 2015 मध्ये हा पदपथ खुला करण्यात आलेला आहे.

२) व्हिक्टोरिया धबधब्यावरील डेव्हिल ्स तलाव – झांबियात व्हिक्टोरिया धबधब्याच्या काठावर हा तलाव आहे तो केवळ उन्हाळ्यात पाहता येतो. उन्हाळ्यात त्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी असते. त्यावेळी लोक तिथे जाऊ शकतात. अर्थात हे अतिशय धोकादायक ठिकाण असून इथून पाय घसरल्यास थेट मृत्यूच्या जबड्यात जातो.

३) ट्रोलतुंगा – ट्रोल्सटंग किंवा ट्रोलतुंगा ही नॉर्वेतील आडवी अशी खोल दरी आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आठ ते दहा तास चालत जावे लागते. या ठिकाणी पोचताना अतिशय आव्हानात्मक अशा डोंगरदऱ्या पार करत जावे लागते. तेथून अचंबित करणारा नजारा दिसतो.
४) फ्राग्रेडल्सजाल – हे ठिकाण आइसलँड मध्ये आहे. हा जिवंत ज्वालामुखीचा पर्वत आहे. नुकताच त्याचा उद्रेक झाला होता. त्यानंतर त्यातून तप्त असा लावा परिसरात पसरलेला होता. या ठिकाणी फक्त शूर आणि साहसी व्यक्तीच जाऊ शकतात.

५) डांकिल डिप्रेशन – हे ठिकाण इथिओपियामध्ये आहे आणि जगातील सर्वात क्रूर जागा म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. या ठिकाणी हवामान अतिशय उष्ण असते आणि जमिनीवर मोठ्या प्रमाणात मीठ आणि सक्रिय ज्वालामुखी आढळतात. या ठिकाणापर्यंत पोहोचणे अतिशय अवघड आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि उष्ण हवामानातून या ठिकाणापर्यंत पोहोचणे मानवी शक्तीच्या पलीकडे आहे.
६) नॉर्थ युनगास रोड – बोलिव्हियातील या रस्त्याला डेथ रोड या टोपण नावाने ओळखले जाते. अतिशय उंचावरील आणि वळणावळणाचा असा अरुंद रस्ता आहे. अनेक ठिकाणी अतिशय अवघड वळणे आणि खोल दऱ्या असल्याने या रस्त्यावरून जीव अक्षरशः मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.

७) ब्ल्यू होल, इजिप्त – इजिप्त मधील लाल समुद्र हा पाणबुड्यांसाठी नंदनवन ठरलेला आहे. मात्र या ठिकाणी जगातील आव्हानात्मक अशी डायव्हिंग साईट आहे. त्या ठिकाणी अतिशय नियोजन करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी डायव्हर्सने जाणे संयुक्तिक ठरते. कारण येथील पाण्याचे प्रवाह केव्हाही बदलतात आणि त्याबद्दल निश्चितता नसल्याने पाणबुड्यांचा जीव केव्हाही धोक्यात येण्याची शक्यता असते.

८) डेथ व्हॅली नॅशनल पार्क – अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी हे ठिकाण आहे. या ठिकाणी अतिशय उष्ण तापमान पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी जाणे लोक शक्यतो टाळतात. या ठिकाणचे सर्वसाधारण तापमान सुमारे 54 अंश सेल्सिअस एवढे असते.
९) उत्तर ध्रुव – आर्टिक समुद्रातील या ठिकाणी अतिशय प्रतिकूल हवामान असते. सर्वत्र बर्फ आणि सगळ्याच गोष्टी गोठून गेलेल्या आढळतातय त्यामुळे इथे पोहोचणे हे मानवासाठी अतिशय आव्हानात्मक ठरते.

१०) एवरेस्ट पर्वत – हे ठिकाण नेपाळमध्ये आहे आणि गिर्यारोहकांसाठी ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे. अनेक गिर्यारोहक एव्हरेस्ट पर्वत सर करणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय बाळगून असतात.

मात्र, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असण्याबरोबरच तुमच्याकडे तांत्रिक कौशल्य आणि खंबीर मनस्थिती असणे आवश्यक असते, एव्हरेस्ट पर्वतावर गिर्यारोहण करणे हे अतिशय जोखमीचे असते. त्यामुळे अनुभवी आणि प्रशिक्षक प्रशिक्षित गिर्यारोहकच त्या ठिकाणी जातात.