#WWC17 | महिला संघाने ‘त्या’ वेळी चक्‍क समोसा खाऊन दिवस काढले; राय यांचा धक्‍कादायक खुलासा

नवी दिल्ली – भारताच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये 2017 साली झालेल्या महिलांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत चक्‍क समोसा खाऊन दिवस काढले, असा धक्‍कादायक खुलासा बीसीसीआयचे तत्कालिन प्रशासक विनोद राय यांनी केला आहे. त्यावेळी मी महिला संघातील खेळाडूंसाठी कीहीही करु शकलो नाही याची खंत आजही वाटते, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

विनोद राय यांनी लिहिलेल्या नॉट जस्ट ए नाईट वॉचमन या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले त्यात त्यांनी अनेक धक्‍कादायक खुलासे केले आहेत. या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया केली होती. मात्र भारतीय संघाला अंतिम लढतीत यजमान इंग्लंडकडून अवघ्या 9 धावांनी पराभव पत्करावा लागल्यामुले विजेतेपदापासून वंचित राहावे लागले होते. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारताच्या महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना साधे जेवणही व्यवस्थित मिळाले नाही. त्यांनी चक्‍क समोसे खाऊन हा सामना खेळला होता, असेही त्यांनी नमुद केले आहे.

हा काळ असा होता की आपल्या देशात महिला क्रिकेटला फारसे महत्व दिले जात नव्हते. महिला क्रिकेटला 2006 सालापर्यंत कोणी गांभिऱ्याने घेत नव्हते. त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरुष आणि महिला क्रिकेट संघटनेला एकत्र करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी महिला क्रिकेट संघाला पुरुष क्रिकेट संघाचे कपडेच अल्टर करून किंवा तसेच वापरण्यास देण्यात येत होते हे ऐकून त्यांना धक्‍का बसला होता. त्यावेळी त्यांनी नाईके या कपडे पुरवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून महिलांसाठी वेगळ्या पद्धतीचा ड्रेस डिझाईन करायला सांगितले, असेही आपल्या पुस्तकात राय यांनी सांगितले आहे.

हरमनप्रीत आणि समोसा

हरनमप्रीत कौरने 2017 सालच्या स्पर्धेत एका सामन्यापूर्वी जेवण न मिळाल्याने चक्‍क समोसे खाण्यावरच भर दिला होता. भारतीय क्रिकेटसाटी ही गोष्ट अत्यंत अवमानकारक होती. हरमनप्रीतचे स्नायू दुखावले होते, तिला धावतानाही त्रास होत होता. तरीही तिने या स्पर्धेत अफलातून खेळी केल्या. तीला सकाळी नाश्‍त्याला फक्‍त समोसे मिळाले होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य लढतीपूर्वी घडलेल्या या काही घटना नंतर बीसीसीआयने गांभीर्याने गेतल्या व ही परिस्थिती आता खूपच सुधारली, असेही राय यांनी नमूद केले आहे.