शनीच्या साडेसातीचीही चोरट्यांना राहिली नाही भीती!

शेवगाव – शेवगावात हल्ली चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, चोरट्यांना आता चोरीसाठी देवस्थानेही वर्ज्य राहिली नाहीत. चोरटे एवढे निर्ढावले आहेत की देवाधिदेव महादेव वा देवादिकांनाही साडेसातीने ताडन करणाऱ्या शनिदेवाचीही त्यांना भीती वाटेनाशी झाली आहे. किंबहुना चोरट्यांनीही नैतिकता सोडली असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शेवगावातील ऐतिहासिक महादेव मंदिरातील दानपेटी फोडल्याच्या घटनेला आठवडाही झाला नाही, तोच तालुक्‍यातील ताजनापूर येथील शनि-मारुती मंदिरातील दानपेटीच चोरीला गेली आहे.
शनिदेवाची दान पेटीच चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी शोध घेतला असता ही दानपेटी जवळच्या उसाच्या शेतात फोडलेल्या स्थितीत आढळली. मात्र, दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली असून, याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या सोमवारी (दि. 17) अमावस्या असल्याने, तसेच अधिक मास सुरू झाल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी सुरू झाली आहे. दर्शनासाठी आलेले भाविक दानपेटीत सढळ हाताने दान करतात. त्यामुळे दानपेटीत मोठी रक्कम जमा झाली असावी असा अंदाज बांधून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी पळवून नेऊन फोडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मंदिराचे पुजारी मुकुंद मुळे नेहमीप्रमाणे शनिदेवाच्या पूजेसाठी गेले असताना त्यांना मंदिराच्या आवारात असलेली दानपेटी दिसली नाही. त्यांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी केली. चोरीस गेलेल्या दानपेटीचा ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्यांना जवळच असलेल्या उसाच्या शेतामध्ये दानपेटी फोडलेल्या स्थितीत आढळून आली. पोलिसांना चोरीच्या घटनेबाबत माहिती कळविल्यानंतर परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मंदिराच्या परिसराची व फोडलेल्या दानपेटीची पाहणी केली. येथील शेतकरी आप्पासाहेब वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.