‘भाजपच्या कार्यालयात हे एक्झिट पोल तयार करण्यात आले..’; ‘या’ बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Lok Sabha Election 2024 । Exit Poll – विविध वाहिन्यांनी काल जाहीर केलेले एक्झिट पोलचे निकाल म्हणजे या प्रकाराचीच चेष्टा आहे अशी प्रतिक्रीया आम आदमी पक्षाचे नेते संजयसिंह यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपच्या कार्यालयात हा पोल तयार करण्यात आला आहे. त्यात तामिळनाडुसारख्या राज्यात भाजपला ३४ टक्के मते मिळतील असे दर्शवण्यात आले आहे हे कसे शक्य आहे असा सवालही त्यांनी केला आहे.

त्यांचा आम आदमी पक्षावर राग आहे, त्यामुळे भाजप कार्यालयातून वाहिन्यांना पंजाबात आम आदमी पक्षाला ० ते २ जागा दाखवा अशी सुचना करण्यात आली आहे, त्यानुसार त्यांनी आम्हाला पंजाबात तेवढ्या जागा दिल्या आहेत.

परंतु वस्तुस्थिती तशी नाही. इंडिया आघाडीतील घटक पक्षांनीही एक्झिट पोल करून घेतले आहेत त्यात इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असल्याचा कौल मिळाला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

जनता का एक्झिट पोल मधून आम्ही केलेल्या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला २९५ पेक्षा अधिक जागा मिळत आहेत. मल्लिकार्जून खर्गे यांनी हाच आकडा काल पत्रकार परिषदेत सांगितला असे ते म्हणाले.

काल जाहीर झालेल्या एक्झिट पोल मध्ये कोणी भाजपला ३५० जागा दिल्या आहेत तर कुणी ४०० जागा दिल्या आहेत. खरे म्हणजे त्यांना सातशेपेक्षा अधिक जागा द्यायला हव्या होत्या.

त्यांना पाकिस्तानातून शंभरएक जागा मिळतील, नेपाळ मध्ये ५० जागा मिळतील, ५० अफगाणिस्तानातून, ५० बांगलादेशातून, ३९-३५ श्रीलंकेतून, ३०-३५ थायलंड मधून आणि इंडोनेशियातूनही त्यांना काही जागा मिळतील अशी खिल्लीही त्यांनी उडवली.