मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – शिवेंद्रसिंहराजे

धावडशी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करून लोकांनी भाजपला साथ दिली आहे. राज्यातही भाजपचेच वारे असून, यापुढे अनेक वर्ष भाजपचीच सत्ता असणार आहे. सातारा-जावळी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रवाहाच्या दिशेने जाणे जरुरीचे होते. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
धावडशी, ता. सातारा येथे पेयजल योजना, स्मशानभूमी रस्ता खडीकरण, प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती, बस थांबा आदींचे भूमिपूजन शिवेंद्रराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, पंचायत समिती सदस्या सौ.सरिता इंदलकर, माजी नगराध्यक्ष अशोक मोने, इंद्रजीत ढेंबरे, मार्केट कमिटीचे संचालक रमेश चव्हाण, सरपंच सौ. मंदाकिनी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवेंद्रराजे म्हणाले, मतदारसंघातील प्रत्येक भागात लाखो रुपयांची विकासकामे झाली आहेत. गावात गट-तट न मानता सर्वांना सदैव सहकार्य केले आहे. गटातटाचा परिणाम विधानसभा निवडणुकीत होऊ देऊ नये. संभाजी इंदलकर म्हणाले, तत्पर व विकासभिमुख लोकप्रतिनिधी आपल्याला लाभले आहेत. त्यांनी या भागातील रस्ते, पाणी, वीज, शाळा आदींसाठी लाखो रुपयांचा निधी दिला आहे. गावोगावी जलयुक्त शिवार योजना राबवल्याने भागाचा कायापालट झाला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने केलेले वनीकरणही कौतुकास्पद आहे.

इंद्रजीत ढेंबरे व प्रतीक कदम यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप पवार यांनी प्रास्ताविक केले. अनिल जायकर यांनी आभार मानले. ग्रामपंचायत सदस्या सौ. पुष्पा पवार, किसन लोहार, शांताराम मस्के, मानसिंग पवार, नंदकुमार पवार, राजेंद्र पवार, सूरज कापसे, पोलीस पाटील जोतिराम पवार, हणमंत पवार, परशुराम पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment