हीच ती वेळ

माणसाच्या आयुष्यात वेळेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अगदी शालेय जीवनापासून वक्‍तशीरपणाचे धडे आपण घेतलेले आहेत. मूल्यशिक्षण शिकत असताना त्यातील मूल्यांतील वक्‍तशीरपणा हा आपल्या मनावर बिंबवला जातो. परंतु हा वक्‍तशीरपणा आपण पुस्तकापुरता किंवा वाचनापुरता मर्यादित ठेवतो. प्रत्यक्ष जीवनात तो आचरणात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात नाही.

पुढे आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनुभवांतून वेळेचे महत्त्व समजू लागते. पुढे नोकरी व्यवसाय करताना वेळेचे महत्त्व अधिकच तीव्रतेने जाणवू लागते. जबाबदारीच्या ओझ्याखालची कसरत करताना वेळ अपुरा पडू लागतो आणि मग आपण म्हणतो की, “काय करणार मला हल्ली वेळच मिळत नाही.’
मुळात वेळ मिळत नाही ही एक मानसिकता आहे. एक अशी अशक्‍त मानसिकता जी तुम्हाला योग्य वेळेत अपेक्षित ध्येयापर्यंत नेऊ शकत नाही. यापुढेही जाऊन एक मानसिकता मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात रुजलेली दिसते आणि ती म्हणजे आता योग्य वेळ नाही, मी योग्य वेळेची वाट पाहतोय अशा आशयाचे डायलॉग सतत बोलायला लावणारी अशी ही मानसिकता.

वेळ असतो परंतु त्या वेळेचा सदुपयोग करण्यापासून आपण स्वतःला रोखतो. बघू या नंतर कधीतरी असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतो. परिणामी योग्य वेळी योग्य संधीचा फायदा घेता न आल्याने आपलेच नुकसान होते.
मला आठवतं साधारणतः आठ दहा वर्षांपूर्वी मी आणि माझा एक मित्र खासगी कार्यालयात नोकरी करीत होतो. माझ्या त्या मित्राला नोकरीत फारसा रस नव्हता. काही करून आपला काहीतरी छोटा मोठा उद्योगव्यवसाय करायचा असा त्याचा मानस होता. तो नेहमी हे मला आणि इतरांना बोलून दाखवित असे.

2012 मध्ये त्याला एका व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. महाशय तो व्यवसाय करण्याची स्वप्ने पाहू लागले. परंतु काही दिवसांनी त्याने त्या नियोजित व्यवसायाच्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करणे सुरू केले. मी त्याला विचारले, का रे त्या व्यवसायाचे काय झाले. तो बोलला, ही योग्य वेळ नाही. मी विचारले, असे का? त्यावर तो बोलला, सध्या माझ्याकडे त्यासाठी लागणारे भांडवल नाही. तो विषय तिथेच थांबला. त्यानंतर वर्षभराने त्याला एका मित्राकडून एका व्यवसायाबद्दल समजले. त्याने त्याबद्दल मलाही सांगितले. मी म्हटले,अरे व्वा, आता यावेळेला तू उद्योजक होणारच म्हणायचं. त्यावर तो निरसपणे उत्तरला, आता या व्यवसायासाठी योग्य वेळ नाही. त्यावर मी त्याला बोललो, तुझ्याकडे आता पैसाही आहे आणि हा व्यवसायही तुझ्या आवाक्‍यात आहे मग आता का नाही? त्यावर मला समजावत तो मला म्हणाला, सध्या मार्केटमध्ये तो व्यवसाय टिकेल, असे मला वाटत नाही. अशाप्रकारे त्या व्यवसायाचा तो विषयही तिथेच संपला.

नुकतीच आमची भेट झाली. अगदी सात आठ वर्षांनी. मी त्याला विचारले, काय रे कसा चालू आहे उद्योगधंदा. त्यावर तो मिश्‍कीलपणे बोलला, नाही नोकरीच करतो आहे. आता मात्र मी टोमणा मारण्याची संधी न दवडता बोललो, अजून ती योग्य वेळ आलेली दिसत नाही. माझ्याकडे खिन्नपणे पाहत तो म्हणाला, वेळ चुकीची नव्हती कदाचित मीच चुकीचा होतो. त्याला त्याच्या वेळेबाबतच्या चालढकलपणाचा चांगलाच पश्‍चाताप झालेला जाणवत होता. या प्रसंगातून जाणवले की आपण आपल्यासमोर निर्माण केलेल्या प्रश्‍नांच्या चक्रव्युहात आपणच अडकून पडतो. भीती,साशंकता,नकारात्मकता आणि यावरून एक धडा मिळाला. योग्य वेळ येईल, याची वाट पाहत बसण्याला काहीही अर्थ नाही. उलट आहे त्या वेळेलाच आपल्याला अनुकूल करता आले पाहिजे. आव्हाने, समस्या आणि प्रश्‍नांना बगल देऊन वेळेचा सदुपयोग करता आला पाहिजे.

आजपासून एक नवी थेअरी आपल्याला अजमावयाची आहे आणि ती थेअरी म्हणजे हीच ती वेळ म्हणण्याची. मार्टिन ल्युथर किंग यांनी वेळेच्या याच थेअरीबाबत सांगताना म्हटले होते की, “इट इज अलवेज द राइट टाइम टू डू द राइट थिंग’, म्हणजेच योग्य गोष्टी करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहू नका. प्रत्येक वेळ ही योग्यच असते. फक्‍त गरज असते ती त्या वेळेला अनुकूल करणाऱ्या मानसिकतेची. चला तर मग वेळेबाबत सबब न देता हीच ती योग्य वेळ म्हणत नव्या यशासाठी सकारात्मकता आणू या. हीच ती वेळ अशक्‍याला शक्‍य करण्याची हीच ती वेळ स्वप्नांना नवे पंख देण्याची आणि हीच ती वेळ यशोशिखराला साद देण्याची…

सागर ननावरे

Leave a Comment