बैलपोळा! यंदा पोळ्यावरही महागाईची झुल, बाशिंगासह गोंड्यांच्या किंमती वाढल्या, खरेदीसाठी बाजारात गर्दी

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – बैलपोळ्याचा सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बैलांचा साज खरेदी करण्याची लगबग सुरु आहे. साजाच्या विविध साहित्याला महागाईचा फटका बसला असून, किंमतींमध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. परिणामी यंदा पोळा सनावरही महागाईची झुल चढली असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांसोबत मित्र, सखा म्हणून वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांचा पोळा हा सण येत्या शुक्रवारी (दि 26) ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. वाढती महागाई आणि दुष्काळाची झळ “सर्जा-राजा’च्या सणाला बसणार आहे. मात्र, वर्षातून त्यांचा सण एकदाच येत असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती आणि साज शृंगाराच्या साहित्याच्या गगनाला भिडलेल्या किमती याची तमा बाळगता शेतकरी आपल्या लाडक्या बैलांचा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत.

शेतकऱ्यांसोबत शेतीच्या सर्वच कामांमध्ये साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण आहे. पिठोरी अमावस्येच्या निमित्ताने हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बैलांना पुरणपोळीचा पाहूणचार केला जातो. या सणाला शेतकऱ्यांमध्ये मोठे महत्त्व आहे. दि 26ऑगस्ट रोजी असलेल्या पोळ्यानिमित्त आदल्या दिवशी दि 25 सप्टेंबरला बैलांची खांदेमळण करण्यात येणार आहे.

यावेळी बैलांची पूजा करुन त्यांना पोळ्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना तलावावर किंवा विहिरीवर नेऊन स्वच्छ धुवून सजवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी गावाच्या पारावर त्यांना पुरणपोळी भरवण्यात येणार आहे. घुंगरमाळा, म्होरक्या दोर, झूल, बाशींग, दोर असा साज-शृंगार बैलांना केला जाणार आहे.

यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यातच महागाईमुळे बैलांच्या सजावटीच्या साहित्याचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तरी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा पोळा हा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी महागाईची तमा बाळगता दुष्काळाची पर्वा करता शेतकरी नवे साहित्य खरेदी करत आहेत.

साहित्य खरेदीला सुरुवात
आर्थिक अडचण असतानाही शेतकरी आपल्या सख्याच्या सणासाठी पैशांची जुळवाजुळव करून साहित्य खरेदी करत आहेत. आठ दिवसांवर पोळा सण आलेला असताना आतापासूनच शेतकऱ्यांनी साहित्य खरेदीला सुरुवात केली आहे.