यंदाची निवडणूक भाजप विरूद्ध सामान्य जनता

कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण : मोदींना पराभूत करणे शक्‍य

पुणे – “ही निवडणूक पक्षीय परिभाषेच्या पलिकडे गेली आहे. ती भाजप विरूद्ध सामान्य जनता अशी होणार आहे. ती उमेदवारांमध्ये होणार नाही. कॉंग्रेस पक्षाकडूनही यापूर्वी काही चुका झाल्या असतील, मात्र आम्ही कोणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणली नाही. मोदींना हरवणे शक्‍यच नाही, असे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र मोदींना पराभूत करता येऊ शकते,’ असे मत माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केले.

लोकशाहीवादी संघटनांचा निर्धार मेळावा आयोजित केला होता. त्याला चव्हाण उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ कामगार नेत्या कॉ. मुक्‍ता मनोहर, कॉ. अजित अभ्यंकर, माहिती अधिकार कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, पी. ए. इनामदार, भटक्‍या विमुक्‍तांसाठी काम करणाऱ्या सुषमा अंधारे आदी उपस्थित होते.

निवडणुकीच्या प्रचारात देशातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षेची काळजी आणि राष्ट्रवादाचा मक्ता केवळ भाजपलाच आहे, असा गैरसमज त्या पक्षाचा झालेला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कुणामुळे धोक्‍यात आली आहे, हे भाजप नेत्यांनी स्पष्ट करावे. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे त्यांच्यावरच उलटणारे आहेत. या निवडणुकीत भाजप पक्षाचा पराभव होणे गरजेचे आहे, असे अभ्यंकर म्हणाले.

लष्कर धर्मनिरपेक्ष ठेवणे गरजेचे आहे. लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख राष्ट्रपती आहेत. मात्र, मोदी ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विखे-मोहितेंनी तिकडे जायलाच पाहिजे होते, कारण त्यांनीच कॉंग्रेस बुडविली, असा आरोप सप्तर्षी यांनी केला.

Leave a Comment