Thomas and Uber Cup 2022 : अमेरिकेवर मात करत भारत उपांत्यपूर्व फेरीत

बॅंकॉक – उबर करंडक महिला बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. मंगळवारी झालेल्या पाच सामन्यांत भारतीय संघाने अमेरिकेवर 4-1 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताने कॅनडाचा असाच 4-1 पराभव केला होता. भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हीने जेनी गेइवर 21-10, 21-11 अशी मात केली. महिलांच्या दुहेरीत तनीशा क्रेस्टो व त्रीसा जडली जोडीने फ्रान्सिका कोर्बेट व अलिसन ली जोडीवर 21-19, 21-10 असा विजय मिळवला.

आकाशी कश्‍यपने इस्टर शे हीचा 21-18, 21-11 असा विजय प्राप्त केला. दुहेरीच्या अन्य लढतीत सिमरन सिंग व रितीका टाकर जोडीला लॉरेन लॅम व कोइ तांग ली जोडीकडून 21-12, 21-17, 21-13 असा पराभव स्वीकारावा लागला.

दिवसातील अखेरच्या सामन्यात अस्मिता छलियाने नताली चेइवर 21-18, 21-13 असा विजय मिळवला व 4-1 अशा वर्चस्वाच्या जोरावर उपांत्यपूर्व फेरी गाठली.