“त्या’ पाच स्टार्टअपना 10 लाखांची कामे देणार – सतेज पाटील

कोल्हापूर – लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वानिमित्त आयोजित स्टार्टअप समिटमध्ये चांगल्या संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्याचा मानस आहे. स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी या इनोवेशन कॉम्पिटीशन व प्रदर्शनात पहिल्या पाच क्रमांकाच्या स्टार्टअपना शासनाकडील 10 लाखाची कामे देण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वानिमित्त शाहू मिल येथे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटी आणि जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकराजा इनोवेशन कॉम्पिटीशन व प्रदर्शन, लोकराजा स्टार्टअप गुंतवणूकदार समिटचे उद्‌घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

पाटील म्हणाले, या इनोवेशन कॉम्पिटीशन व प्रदर्शनातून चांगले विषय समोर यावेत. कोल्हापूरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी याची मदत व्हावी, यासाठी चांगल्या संकल्पनाना प्रोत्साहन देण्याची भूमिका आहे. कोल्हापूरात इनोवेशनसाठी चांगले वातावरण असून विद्यार्थी व उद्योजकांनी यामध्ये सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आजच्या काळात छोट्या-छोट्या गोष्टींना मोठी मागणी असून या गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी स्टार्टअप एक प्रभावी माध्यम आहे. नवे विचार, नव्या संकल्पनांचा स्वीकार राज्य शासन करत असून राज्य शासनाने टेक्‍नॉलॉजी संबंधातील कामे स्टार्टअपना देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले.