पुणे जिल्हा | शोभायात्रेत हजारो अनुयायांनी सहभाग

बारामती, (वार्ताहर)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती बारामती शहर आणि परिसरात उत्साहात आणि विविध उपक्रमांनी पार पडली. मध्यरात्रीपासून शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भिम अनुयायींनी गर्दी केली होती.

यावेळी सकाळी 9:30 वाजता प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

सायंकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह अन्य महापुरुषांच्या प्रतिमेच्या भव्य शोभायात्रेचा प्रारंभ बुद्धविहार सिद्धार्थ नगर येथून झाला. ही शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकमार्गे शहराच्या मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आली.

शोभायात्रेत हजारो अनुयायांनी सहभाग नोंदविला. महिलांची संख्या लक्षणीय होती. शहरातील प्रत्येक चौकात शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी विविध मंडळांच्या वतीने आकर्षक सजावट केलेल्या स्वागत कक्षांची उभारणी केली होती.

याप्रसंगी कैलास चव्हाण, भारत अहिवळे, विजय गव्हाळे, सुभाष ढोले, सचिन सातव, इम्तियाज शिकीलकर, सत्यव्रत काळे, संभाजी होळकर, काळुराम चौधरी, नवनाथ बल्लाळ, अनिता जगताप, विजय खरात, प्रो. रमेश मोरे, सचिन साबळे, संजय लालबिगे, गणेश सोनवणे,

अभिजित चव्हाण, ॲड. सुशिल अहिवळे, गौतम शिंदे, आप्पा अहिवळे, बबलू जगताप, शुभम अहिवळे, सुनील शिंदे, मंगलदास निकाळजे, अनिकेत मोहिते, बंटी जगताप, मनोज दामोदरे आदी उपस्थित होते.

पुस्तक स्टॉलवर अनुयायांची गर्दी
समता सैनिक दलाकडून बाबासाहेबांना मानवंदना देखील देण्यात आली. दिवसभर शहरातील विविध भागात पूजापाठाच्या कार्यक्रमांसह विधायक उपक्रमांचे देखील आयोजन केले होते. पुतळा स्मारक परिसरात लावण्यात आलेल्या पुस्तक स्टॉलवर बहुजन महापुरूषांच्या विचारधारेची पुस्तके खरेदी करण्यासाठी देखील अनुयायींनी मोठी गर्दी केली होती. युवकांकडून लाडू वाटप करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.