#व्हिडिओ: चीनमध्ये एकाच पर्यटनस्थळावर २० हजार नागरिकांची गर्दी

नवी दिल्ली : जगात कोरोनाचा जन्म ज्याठिकाणावरून झाला त्या चीनमध्ये दैनंदिन जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहेत. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील अनेक भागांमधील बंदी उठवण्यात आली आहे. अनेक पर्यटनस्थळे पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. जवळजवळ दोन महिन्यांच्या क्वारंटाइननंतर अनेकजण घराबाहेर पडले आहेत.

पूर्व चीनच्या अनहुई प्रांतामधील हुआंगशान पर्वत येथील पर्यटनस्थळावर तर हजारो पर्यटकांनी गर्दी केल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. डोंगराळ भागात असणारे हे पर्यटनस्थळ निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथील प्रवेश फी काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याने जवळजवळ २० हजार पर्यटकांनी येथे गर्दी केल्याचे सांगितले जाते आहे.


या ठिकाणी दिवसभरामध्ये मर्यादित पर्यटकांना प्रवेश दिला जातो. मात्र ही मर्यादा वाढवून २० हजार करण्यात आली. त्यातच प्रवेश फी रद्द करण्यात आल्याने पहिल्या दोन दिवसांमध्येच येथे २० हजारहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. ही गर्दी पाहून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याची विनंती केली आहे. विषाणू पूर्णपणे नष्ट झाला नसून लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये लोक गर्दी करुन प्रवेश मिळवण्यासाठी उभे असल्याचे दिसत आहे. यावेळेस सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसून काहीजण मास्क न लावताच या गर्दीमध्ये दिसून येत आहेत. याचबरोबर शांघायमधील बुंड धबधबा या पर्यटनस्थळावरही मोठी गर्दी झाली होती.

Leave a Comment