नगर | फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

नगर, (प्रतिनिधी) – कॉलेज युवतीचा वारंवार पाठलाग करून प्रेमसंबंध ठेवले नाही तर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या तरूणाविरोधात येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागापूर परिसरात पीडित युवतीने याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.१९) सायंकाळी फिर्याद दिली आहे.

करण साहेबराव मापारी (रा. घोलप वस्ती, एमआयडीसी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. सदरची घटना २१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडली आहे. फिर्यादी युवती नागापूर परिसरात राहतात. त्यांचे शिक्षण सुरू आहे. करण मापारी याने २१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान फिर्यादी युवतीच्या घरासमोर येऊन त्यांच्या नावाने आवाज देऊन निघून जात असे.

तसेच फिर्यादीचा वारंवार पाठलाग करून,‘तु माझ्याशी प्रेम संबंध ठेव, नाही तर तुझे फोटो व्हायरल करील, माझ्या जीवाचे काहीतरी करीन’, अशी धमकी देत होता. दरम्यान पीडितीने यासंदर्भात घरी सांगितल्यानंतर त्यांनी सोमवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून करण मापारी विरोधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चव्हाण करीत आहेत.