काश्‍मीरमधील चकमकीत तीन अधिकारी शहीद

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत सुरक्षा दलांचे तीन अधिकारी शहीद झाले. त्यामध्ये लष्कराचे कर्नल, मेजर आणि पोलीस उपअधिक्षकाचा समावेश आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग भागात ती चकमक झडली. त्यामध्ये 19 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रित सिंह, मेजर आशिष ढोनक आणि पोलीस उपअधिक्षक हुमायून बट गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. पण, त्या शूर अधिकाऱ्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. चकमकीत सामील दहशतवादी रेझिस्टन्स फ्रंट या गटाचे सदस्य असल्याचे समजते. तो गट लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी संलग्न आहे.

कोकेरनाग भागात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी सायंकाळी शोधमोहीम हाती घेतली. ती मोहीम रात्री थांबवण्यात आली. त्यानंतर एका ठिकाणी दहशतवादी दडले असल्याची माहिती बुधवारी सकाळी देण्यात आली. त्या ठिकाणाला सुरक्षा दलांच्या पथकांनी वेढले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक झडली. त्यावेळी दहशतवाद्यांचा निकराने मुकाबला करताना तीन अधिकाऱ्यांनी प्राणांचे बलिदान दिले.