पुण्यातील अन्य तीन व्यक्‍तीही करोनामुक्त; आज घरी सोडणार

पुणे – जिल्ह्यातील पहिल्या दोन्ही करोनाबाधित व्यक्‍तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना बुधवारी (दि. 25) सकाळी घरी सोडण्यात आले असून, नवीन वर्षाच्या मुहुर्तावर डॉक्‍टर, प्रशासन आणि राज्य शासन यांच्या अथक प्रयत्नामुळे करोनावर मात करून नवीन वर्षांची सुरुवात आनंदी झाली. तसेच दुसऱ्या दिवशी जे तीन रुग्ण दाखल झाले होते, त्यांचे पहिले नमुने निगेटिव्ह आले असून, आज दुसरे नमुने घेण्यात येणार आहे. ते निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनाही गुरुवारी (दि. 26) घरी सोडण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतानाच विभागीय आयुक्‍तांनी सर्व नागरिकांना आवाहन करत, घराबाहेर कोणीही पडू नये, 21 दिवस घरातच बसून आपण आपले संरक्षण करू आणि सर्वांच्या मदतीने करोनावर मात करू, असा विश्‍वासही व्यक्‍त केला. एका नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीबरोबर दुबईला गेलेल्या सहलीतील 40 जणांचा ग्रुप 1 मार्च रोजी मुंबई विमानतळावर उतरला. त्यामध्ये पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, धुळे, अहमदनगर यासह अन्य जिल्ह्यातील प्रवाशी होते.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणारे एक दाम्पत्य मुंबई विमानतळाहून कॅबने पुण्यात आले. काही दिवसांनी त्यांना सर्दी, ताप आल्यामुळे नायडू रुग्णालयात दाखल केले आणि जिल्ह्यातील पहिले “करोना पॉझिटिव्ह’ रुग्ण सापडले. त्यामुळे प्रशासनासह राज्य सरकार खडाडून जागे झाले. दुसऱ्या दिवशी त्यांची मुलगी, कॅबचालकासह तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मागील 14 दिवसांपासून या दोन्ही रुग्णांवर नायडू रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका दिवस-रात्र काळजी घेऊन उपचार करत आहेत. आज या प्रयत्नांना यश आले असून, या दोन्ही रुग्णांचे “पॉझिटिव्ह’ असलेले नमुने “निगेटिव्ह’ आल्यामुळे करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे.

दरम्यान, आज सकाळी या दोन्ही रूग्णांना घरी सोडले असून, पुढील 14 दिवस या दोघांनीही घरातच थांबायचे आहे. त्यांनी काय आहार घ्यावा, कसे रहावे याबाबतच्या सूचना डॉक्‍टरांकडून देण्यात आल्या आहेत. तसेच उद्या अन्य तिघांचे दुसरे नमुने निगेटीव्ह आल्यावर त्यांनाही घरी सोडण्यात येईल. तर पुढील रूग्णांचे 14 दिवस पूर्ण होण्यासाठी अजूनही तीन ते चार दिवस आहेत. त्यांचीही याचप्रकारे तपासणी करून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरूच राहणार
लॉकडाऊन म्हणजे जीवनावश्‍यक गोष्टींची दुकाने बंद राहणार असे नाही. किराणा, भाजीपाला, औषध, दूध, फळे आदी जीवनाश्‍यक वस्तूंची दुकाने नियमित सुरू राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून गर्दी करू नये, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

पहिले दोन पेशंट बरे व्हावेत, यासाठी आरोग्य यंत्रणेने रात्रंदिवस अथक प्रयत्न केले. पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच विभागाच्या इतर जिल्ह्यांतील अधिकारी हे करोनाच्या प्रतिबंधासाठी काम करत आहेत. या सर्वांचे विभागीय आयुक्‍तांनी कौतुक केले. परंतु, काही कर्मचारी आदेशाचे उल्लंघन करून निघून जात असतील, तर त्यांच्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या संकटात कुठेही डगमगून जाऊ नका, आपण सर्व एकत्र मिळून करोनावर मात करू. स्वत:ला आणि सगळ्यांना सुरक्षित ठेवा.
– डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्‍त, पुणे

Leave a Comment