संत गाडगेबाबा अभियानांतर्गत तीन गावांची होणार निवड

सातारा – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय अंतिम तपासणी सुरु होणार आहे. प्रत्येक तालुक्‍यातील एका गावाची व ग्रामपंचायतींची पाहणी समितीच्यावतीने करुन गुणांकन केले जाणार आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय तीन गावांची निवड करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास पाच लाख, द्वितीय क्रमांकास तीन लाख तर तृतीय क्रमांकास दोन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सातारा तालुक्‍यातील जांभगाव, कोरेगाव तालुक्‍यातील वाठार स्टेशन, खटाव तालुक्‍यातील तरसवाडी, माण देवापूर, फलटण जाधववाडी, खंडाळा घाडगेवाडी, वाई भोगाव, जावळी तालुक्‍यातील म्हाते खुर्द, महाबळेश्वर रामेघर, कराड तालुक्‍यातील बनवडी, पाटण तालुक्‍यातील आवर्डे या गावांची तपासणी होणार आहे. घनकचरा व्यवस्थापन, पाणी व सांडपाणी व्यवस्थापन, घरपट्टी वसुली व स्वच्छतेच्या दृष्टीने पाहणी होणार आहे.