पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची न्यायालयात धाव

पुणे – पत्नी लग्नापूर्वी नोकरी करत नसतानाही असल्याची खोटी माहिती देणे, तसेच पतीसह सासरच्या लोकांना शिवीगाळ करणे, त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जाणे, पतीला मारहाण करणे अशा पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने समन्स बजावूनही पत्नी न्यायालयात हजर राहिली नाही. तिने न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले नाही. अथवा बचावात्मक पुरावा सादर केले नाही. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी कदम यांनी पतीला एकतर्फी घटस्फोट मंजूर केला.

राहुल आणि रिना (नाव बदललेली ) यांचे ६ जून २०२१ रोजी लग्न झाले. लग्नानंतर रिना राहुलच्या घरी आली. लग्नापूर्वी तिने राहुलला पुणे विद्यापीठातून बी.कॉम. पदवी घेतल्याचे सांगितले. एका दुकानात ती अकाउंटंट म्हणून नोकरी करते. तिला १५ हजार रुपये पगार आहे. तसेच, पत्नीचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दहा दिवसांत पत्नीने माहेरी जायचा हट्ट धरला. तिला सोडणे शक्य नसल्याने रिनाने भांडणे सुरू केली, वस्तू फेकल्या.

आई आजारी पडल्याने तिला दूध गरम करण्यास सांगितल्यानंतर तिने राहुलला शिवीगाळ करून डोक्यावर व पोटात मारहाण केली. नोकरीबाबत विचारणा केली असता, तिने भांडण सुरू केले. त्याची आई भांडणे सोडविण्यासाठी आली असता रिनाने स्वयंपाक घरातील चाकू आणून त्याच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पतीचे म्हणणे आहे. अखेर पत्नीच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पतीच्या वतीने अ‍ॅड. पुष्कर पाटील यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.

पत्नीला न्यायालयाने समन्स बजावले. मात्र समन्स बजावूनही ती न्यायालयात हजर झाली नाही. त्यामुळे घटस्फोटाचा दावा एकतर्फी चालवून न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. पतीतर्फे अ‍ॅड. पुष्कर पाटील, अ‍ॅड. रोहन खर्चे आणि अ‍ॅड. आदित्य पाटील यांनी बाजू मांडली