PUNE: टोमॅटोची आवक, दर आवाक्‍यात

पुणे – महिन्याभरापूर्वी किरकोळ बाजारात 200 रुपये किलो झालेल्या टोमॅटोच्या भावात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन आलेल्या पिकामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागात टोमॅटोची आवक वाढली आहे. महिन्याच्या तुलनेत आता दुप्पट आवक होत आहे. घाऊक बाजारात टोमॅटोला किलोला 25 ते 35 रुपये, तर किरकोळ बाजारात 50 ते 70 रुपये भाव मिळत आहे.

काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला भाव नव्हते. परिणामी, टोमॅटोची कमी लागवड झाली होती. त्यात पाऊस लांबल्याचा फटका पिकाला बसला होता.  परिणामी, मागणीच्या तुलनेत कमी आवक होत होती. त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढले होते. घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव 80 ते 100 रुपये झाले होते. तर किरकोळ बाजारात तब्बल 160 ते 200 रुपये किलो भावाने टोमॅटोची विक्री होत होती. वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून टोमॅटो गायब झाले होते.

हॉटेल व्यावसायिकांना ग्रेव्ही, पावभाजी, सांबरसह विविध खाद्य पदार्थ बनविण्यासाठी टोमॅटो लागतोच. त्यामुळे केवळ त्यांच्याकडूनच टोमॅटोची खरेदी करण्यात येत होती. मात्र, आता चित्र बदलले आहे. आवक वाढली आहे. पुणे विभागातूनच ही आवक होत आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटोच्या भावात घसरण होत असल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ आणि किरकोळ विक्रेते संघटनेचे प्रकाश ढमढेरे यांनी दिली.