16 जिल्ह्यांत झाले मतदान: उद्या 547 सरपंचांची थेट जनतेतून होणार निवड

मुंबई – राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींचा उद्या, सोमवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी उद्या होईल.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार तालुक्‍यातील 149 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. काही मतदान केंद्रावर साडेपाचनंतर देखील मतदानासाठी रांगा असल्याचे दिसून आल्या. त्यामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या आत असणाऱ्या मतदारांना घेवून मतदान सुरु होते. जिल्ह्यात पाचवाजेपर्यत अंदाज 72 टक्के मतदान झाले. दरम्यान, आज झालेल्या मतदान प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडून आलेला नाही.