गुरुजींच्या ठेवी यापुढे वर्ग होणार नाहीत

विकास मंडळाच्या इमारतीसाठी समन्वय समिती

नगर – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी उभारण्यात येत असलेल्या विकास मंडळाच्या इमारत बांधकामासाठी शिक्षक बॅंकेच्या सभासदांच्या ठेवी यापुढे वर्ग करता येणार नाही.तसेच या इमारती संदर्भात सर्व विरोधी शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्यात येईल,असा निर्णय जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाने घेतला.

संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली.त्यात रावसाहेब रोहकले अध्यक्ष असताना बॅंकेतील ठेवी वर्ग करण्याचा जो ठराव घेतला होता तो यापुढे लागू राहणार नाही असा नवा ठराव घेण्यात आला. रोहकले यांच्या काळात सभासदांकडून दहा हजारांची ठेव वर्ग करण्यास जिल्हा उपनिंबधक यांनी परवानगी दिली होती.परंतु लाखो रुपयांच्या नियमबाह्य ठेवी त्यावेळी वर्ग करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.

आरबीआयच्या निर्देशानुसार कोणत्याही सभासदाच्या कायम ठेवी इतर ठिकाणी वर्ग करण्यात येत नाही असे असताना हा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे दिलेल्या ठेवींची कुठलीही पावती विकास मंडळाने बॅंकेला दिलेली नाही.त्यामुळे यापुढे विकास मंडळाकडे कोणत्याही ठेवी वर्ग करण्यात येऊ नये असा ठराव संमत करण्यात आला.ज्या 85 लाखांच्या ठेवी यापूर्वीच वर्ग करण्यात आल्या आहेत त्या पुन्हा बॅंकेत वर्ग करण्यात येणार आहे.15 सप्टेंबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा ठराव मांडला जाणार आहे.

विश्‍वस्तांच्याच ठेवी वर्ग नाहीत
ज्या विकास मंडळासाठी या ठेवी वर्ग करण्याचा घाट घातला आहे त्या विकास मंडळाच्या विश्‍वस्तांनीच आपल्या ठेवी वर्ग केल्या नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

बॅंकेच्या संचालकांना कारवाईची भीती
जिल्हा उपनिबंधकांनी ठेवी वर्ग करण्यास परवानगी दिली होती मात्र याबाबत काही न्यायालयीन वाद उद्धभवल्यास त्यास बॅंकेचे संचालक जबाबदार राहतील असे स्पष्ट केले होते.त्यामुळे विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाने कारवाईच्या भीतीने हा ठराव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तरेतील गुरुजींचा विरोध
सध्या जिल्हा विभाजनाचे वारे वाहत आहे त्यामुळे जर जिल्हा विभाजन झाले तर या इमारतीचा आम्हाला काय फायदा? तसेच या जागेचा लाभ पूर्वी नगर व पारनेरच्या गुरुजींच्या पुढाऱ्यांनाच होत होता,आताही त्यात काही फारसा बदल होणार नाही असा सूर उत्तरेतील पुढारी आवळत आहेत.

Leave a Comment