Jio, Airtel, VI आणि BSNL च्या वापरकर्त्यांना सतर्कतेचा इशारा, ‘अशा’ मेसेजवर चुकूनही विश्वास ठेवू नका..

Telecom Users: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने दूरसंचार सेवा प्रदाते Jio, Airtel, Vodafone-Idea आणि BSNL यांना वापरकर्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यास सांगितले आहे. या चेतावणीद्वारे, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांना सायबर गुन्हे करणाऱ्या लोकांकडून पाठवल्या जाणार्‍या संदेशांपासून सावध राहण्यास सांगतील.

इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना ट्रायचे सचिव व्ही. रघुनंदन म्हणाले की, आजकाल सायबर गुन्हेगार टेलिकॉम कंपन्या आणि ट्रायच्या नावाने लोकांना चुकीचे संदेश पाठवत आहेत आणि त्यांची फसवणूक करत आहेत. आम्ही सर्व वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी आणि लोकांना सल्ला देण्यासाठी एक चेतावणी संदेश पाठवत आहोत.

गेल्या अनेक वर्षांपासून देशभरातील हजारो सायबर गुन्हेगार टेलिकॉम कंपन्यांचे टॉवर बसवण्याची, ना हरकत प्रमाणपत्र किंवा कनेक्शन बंद करण्याची धमकी देऊन लोकांना घाबरवतात किंवा आमिष दाखवतात आणि नंतर मोबाईल क्रमांक पडताळणी किंवा यांसारख्या गोष्टींची मागणी करून पैशांची फसवणूक करतात. OTP मागून आर्थिक फसवणूक केली जाते.

अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे ट्रायने सर्व कंपन्यांना युजर्सना इशारे देण्यास सांगितले आहे. या चेतावणीमध्ये एक विशेष संदेश असेल, ज्यामध्ये असे लिहिले जाईल की TRAI कधीही ग्राहकांना मोबाईल नंबर सत्यापित करण्यासाठी, नंबर डिस्कनेक्ट करण्यासाठी किंवा बेकायदेशीर क्रियाकलापांची तक्रार करण्यासाठी कोणताही कॉल किंवा संदेश पाठवत नाही.

ट्रायच्या नावाने येणारे असे कॉल आणि मेसेजपासून सावध राहा. ट्रायच्या नावाने दावे करणाऱ्या कॉल्स किंवा मेसेजवर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी विचार करणे महत्त्वाचे आहे. वापरकर्ते नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर फसवणुकीची शक्यता नोंदवू शकतात. TRAI हे सर्व संदेश BT-TRAIND हेडरसह एसएमएस करेल.