पुणे | दिल्ली शिक्षण विभागाच्या विशेष नियुक्त पथकाचे ज्ञानप्रबोधिनीत प्रशिक्षण

पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- दिल्ली सरकारतर्फे अभिषिक्त या नावाने विशेष क्षमतावान विद्यार्थ्यासाठी १५ केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यात त्यांच्या क्षमता संवर्धनासाठी विशेष योजना असणार आहेत. ज्ञानप्रबोधिनी गेली सुमारे ६० वर्षे याच प्रकारचे काम करत आहे. त्यामुळे ज्ञानप्रबोधिनीचे या विषयातील अनुभव, उपक्रम जाणून घेण्यात या पथकाने विशेष रुची दाखवली.

दिल्ली शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालिका निरूपमा अभ्यंकर यांच्या पुढाकारातून दिल्ली शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. सुधाकर गायकवाड आणि दिल्लीच्या अभिषिक्त प्रकल्पाच्या विशेष कार्यकारी अधिकारी उषा राणी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागातील निवडक ३० शिक्षक आणि काही पदाधिकारी १९ फेब्रुवारी ला ज्ञान प्रबोधिनीत काही प्रशिक्षण सत्रांसाठी आले आहेत.

या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू विशेष क्षमतावान विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी असते ते जाणून घेणे, त्यांसाठीच्या अभ्यासक्रम-योजना, त्यांच्यासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक प्रकल्पांची, नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती करून घेणे, असा आहे.

ज्ञानप्रबोधिनीचे ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक, प्रज्ञा मानस संशोधिकेच्या संचालिका डॉ. अनघा लवळेकर, डाॅ. सुजला वाटवे, डाॅ. धनश्री सोवनी, निगडी केंद्राचे प्रमुख डॉ मनोज देवळेकर, तसेच या विषयातिल तज्ज्ञ वर्षा पुराणिक, ईशा कान्हेरे, क्षमा दातार, हेमांगी देशमुख यांनी वेगवेगळी सत्रे घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर श्रेयस फापाळे आणि मृण्मयी वैशंपायन यांनी संपूर्ण प्रशिक्षणांचे नियोजन केले.

याशिवाय ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या प्रथितयश माजी विद्यार्थ्यांशीही या पथकाने संवाद साधला. यामधे सुनील दाढे (डेप्यु. सीएजी), वामन पारखी (आयआरएस आणि सुरेश प्रभू यांचे सचिव) , महेंद्र सेठिया (कार्यवाह, ज्ञान प्रबोधिनी), सुवर्णा गोखले (स्त्री शक्ती प्रबोधन), सचिन गाडगीळ (एचआर तज्ज्ञ) यांचा सहभाग होता. या संवादातून प्रबोधिनीतील वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाविषयी आणि विशेषतः बुद्धिवंतांच्या शिक्षणाचे तत्त्वज्ञान आणि विशेष उपक्रम या मंडळींनी समजावून घेतले.