ट्रान्सफॉर्मरचा स्फोट; विजेच्या धक्क्याने 15 जणांचा मृत्यू

चमोली (उत्तराखंड) – चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर असलेल्या नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी वीज ट्रान्सफॉर्मरच्या दुर्घटनेत 15 जणांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन होमगार्ड आणि एका पोलिसाचा समावेश आहे.

चमोलीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एनके जोशी यांनी सांगितले की, मंगळवारी उशिरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेचा रिपोर्ट घेण्यासाठी पोलिस घटनास्थळी गेले होते. त्यावेळी ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट झाला आणि त्याच्या वीजेचा धक्का बसून पोलिस कर्मचारी आणि तेथे उपस्थित असलेले नागरीक ठार वा जखमी झाले.

प्राथमिक माहितीनुसार यात पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जोशी यांनी दिली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काहींना हेलिकॉप्टरने ऋषिकेश येथे एम्स रूग्णालयात नेण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले असून त्यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत.