पुण्यात तृतीयपंथी सारिकाचा दगडाने ठेचून खून : दरी पुलाजवळील घटना

पुणे- कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाच्या जंगलात एका तृतीयपंथीयाचा दगडाने डोक ठेचून खून करण्यात आला आहे. ही घटना सकाळी उघडकीस आल्यावर भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली . मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

सागर उर्फ सारिका उसगरे (वय 23) असे खून झालेल्या तृतीयपंथीयांचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर उर्फ सारिका याचा दरी पुलाजवळील टेकडीवर जाण्याच्या रस्त्यावर झाडात मृतदेह टाकण्यात आला होता. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास याची खबर पोलीसांना मिळाली. भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी डोक्‍यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. तपासणी करत असताना तो तृतीयपंथी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृताची ओळख पटल्यावर आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत