“खरंय, आकडे कधी खोटं बोलत नाहीत”; लोकसभेत खासदार डॉ. कोल्हे यांची केंद्र सरकारवर टीका

हडपसर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेहमीच म्हणतात की, आकडे कधी खोटं बोलत नाहीत. परंतु, केंद्र सरकार केवळ इकॉनॉमिकल ग्रोथचे आकडे जनते पुढे फेकते. पण, दरडोई उत्पन्नावर बोलत नाही. आकडे कधीच खोटं बोलत नाहीत हे खरे आहे त्यामुळेच अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर दिसत असली तरी दरडोई उत्पन्नामध्ये जगात आपण 141 क्रमांकावर आहोत, हे वास्तव लपवले जात आहे. याचा अर्थ देशाची संपत्ती काही मोजक्‍या धनदांडग्याच्या हातात एकवटत आहे, अशी जळजळीत टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

लोकसभेतील अविश्‍वास प्रस्तावावर बोलताना खासदार डॉ. कोल्हे यांनी केद्र सरकारला विविध मुद्यांवर धारेवर धरले. डॉ. कोल्हे म्हणाले की, केंद्र सरकार सातत्याने किसान सन्मान निधीचा उल्लेख करते. परंतु, किटकनाशके आणि खतांच्या किंमतीत 4 ते 5 पट वाढ झाली हे मात्र सांगत नाही. दर मिळत नसल्याने शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत होता, तेव्हा हे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आले नाही, अशी घणाघाती टीका करीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधानांना नुकत्याच मिळालेल्या लोकमान्य टिळक पुरस्काराचा संदर्भ देत “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा जळजळीत सवाल केला.

  • इकॉनॉमिकल ग्रोथचे आकडे जनतेपुढे आणले जातात
  • दरडोई उत्पन्नामध्ये जगात आपण 141 क्रमांकावर

केंद्र सरकारची कार्यपद्धती पाहिली की…

केंद्र सरकारची कार्यपद्धती पाहिली की, गांधीजींच्या तीन माकडांची आठवण होते, असे सांगत सरकारच्या विरोधात काही ऐकू नका, निवडणुका वगळता देशाची परिस्थिती बघू नका आणि विरोधी पक्षनेत्यांची तोंड बंद करा, ही सरकारची नीती असल्याची टीका खासदार कोल्हे यांनी केली.