माढा मतदारसंघात तुतारी वाजणारच

दहिवडी – उमेदवार कोणीही असो, माढ्यामध्ये तुतारी वाजणारच, असा ठाम विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. म्हसवड (ता. माण) येथील बाजार पटांगणात आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रभाकर देशमुख, अभिजित पाटील (पंढरपूर), अभिनेते किरण माने, कविता म्हेत्रे, प्रतिभा शिंदे, संतोष वारे (करमाळा), बाळासाहेब सावंत, विशाल जाधव, डाॅ. महेश माने, दिलीप तुपे, युवराज बनगर, सुनील सावंत (करमाळा),

महेश गुरव, महादेव मासाळ, विलासराव माने, संजय निवगुंडे (माळशिरस), भाग्यश्री पाटील (कुर्डुवाडी), किशोर सोनवणे, प्रशांत विरकर, विजय जगताप, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आदी मान्यवर उपस्थित होते. शशिकांत शिंदे म्हणाले, अनेक जण पक्ष सोडून जात असताना अभयसिंह जगताप हा युवक ८४ वर्षाच्या योद्ध्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतो हे त्याचे कौतुक आहे. हुकुशाहीचं राज्य येऊ नये, व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येवू नये, स्वाभिमान डिवचला जावू नये यासाठीचा हा लढा आहे.

प्रभाकर देशमुख म्हणाले, माढा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात अभयसिंह जगताप पोहचले आहेत. जगताप यांना संधी द्यावी ही मागणी आहे. समोरची जनता आणि वक्ते हे महाविकास आघाडीच्या यशाची खात्री देत आहेत, असे अभिजित पाटील यांनी सांगितले. सर्व जण सरकारची भलावण करण्यात दंग आहेत. अत्यंत घृणास्पद राजकारण सध्या सुरु आहे. वाईट वातावरणाला बळी पडू नका, असे आवाहन किरण माने यांनी केले. माढ्यामधील राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून अभयसिंह जगताप यांनी निष्ठावंतालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी असल्याचे स्पष्ट केले.