आई राजा उदो…उदो च्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना..

श्री तुळजाभवानी देवीजींचा नवरात्र महोत्सवास प्रारंभ

उस्मानाबाद: महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे रविवारी धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते आज विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने, आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.

यावेळी मंदिरातील पहिल्या दिवसाच्या मुख्य पुजेचा मान मुकूंद संभाजी कदम (बाबर) यांना मिळाला. त्यांनी मंदिरात विधिवत पूजन केले. त्यानंतर घटकलशाची पारंपरिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तिर्थापासून या घटकलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली.

मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी दर्शन मंडप सुविधेचा लाभ घ्यावा. शिस्तबध्द पध्दतीने व धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे. तसेच कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अनेक भाविक वेगवेगळ्या भागातून पायी चालत तुळजापूर येथे येतात त्यांनी वाहतूक मार्गावरुन चालतांना काळजी घ्यावी, असे आवाहन ही जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे घटस्थापनेनंतर केले. त्यांनी सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.

प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत. आज हजारो भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. वेगवेगळ्या गावातूनही युवक भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे चालत येतानाचे चित्र दिसत होते.

नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन, नगरपालिका, तहसील कार्यालय यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ आदि विभागांनीही भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्यासह नगराध्यक्ष बापुसाहेब कने, महंत तुकोजी बुवा, महंत हयरुजी बुवा, महंत चिलोजी बुवा पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी, मंदिर संस्थानचे तहसीलदार योगिता कोल्हे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment