तुळजाभवानीचा चांदीचा मुकुटही गायब ! महंत चिलोजीबुवा फरार.. पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

सोलापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट गायब झाला असल्याचे समोर आले आहे. मंदिर संस्थानच्या वतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

२०११ सालापूर्वी चांदीचा मुकुट मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर चांदीची प्रभावळ, चांदीचे त्रिशूळ, मोत्याचे आणि सोन्याचे तुकडे असा दुर्मिळ आणि पुरातन अलंकाराचा मोठा ऐवज तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून करण्यात आला आहे.

एका वृत्‍तवाहिनीने दिलेल्‍या माहितीनुसार, तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकुट गहाळ झाल्याच्या वृत्ताने सगळीकडेच खळबळ माजली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने सारवासारव करीत सोन्याचा मुकुट सापडल्याचा दावा केला आहे.

पोलीस आता वस्तुस्थितीत नक्की काय? याचा मागोवा घेत आहेत. दरम्यान तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले. सोमनाथ माळी यांनी दिलेल्या तक्रारीत डबा क्र. ७ मधील रेशमासह ४३ भार वजन असलेला चांदीच्या मुकुटाचा अपहार झाला असल्याचे म्हटले आहे. हा चांदीचा मुकुट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता.