पुणे जिल्हा | तमाशा पंढरीत दोन्ह कोटींची उलाढाल

नारायणगाव, (वार्ताहर) – नारायणगावची ओळख असलेल्या राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग तमाशा पंढरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावच 175 करार झाले असून दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली. 175 करार.. दोन कोटीची उलाढाल.. चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा 3 लाख 26 हजार बुकिंग तर राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग यांचा 3 लाख 15 हजार रुपयांना बुकिंग झाले आहे.

तमाशा पंढरीत नामांकित तमाशा फड मालकांच्या 35 राहुट्या आहेत. ग्रामीण भागात यात्रा जत्रांचा हंगाम सुरू झाल्याने ग्रामीण भागातील अनेक तमाशा रसिक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नारायणगावात येऊन गावच्या जत्रेसाठी तमाशाचे बुकिंग करीत असतात.

नारायणगावच्या तमाशा पंढरीत पाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, अहमदनगर, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व खान्देशातील तमाशा रसिकांनी उपस्थिती लावून गावच्या यात्रा जत्रांसाठी तमाशाचे बुकिंग केले आहे. नामांकित तमाशा फडमालकांकडे मे महिन्याच्या अखेरपर्यंत अवघ्या आठ ते दहा तारखा शिल्लक असल्याचे दिसून येत होते.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायंकाळी सात वाजेपर्यंत तमाशा फडमालकांचे एक लाखापासून दोन लाखापर्यंत तमाशाचे बुकिंग झाले आहे. तर नामांकित तमाशा फड मालकांचे मे महिन्याच्या अखेर पर्यंत तमाशाचे संपूर्ण बुकिंग झाले आहे.

आचारसंहितेचा फटका
लोकसभेच्या निवडणुका तमाशा कलावंतांच्या मुळावर आलेल्या दिसून येत आहे. प्रशासनाने तमाशा कलावंतांना सायंकाळी सात ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत तमाशा चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु ग्रामीण भागात रात्री दहा वाजेनंतर तमाशा सुरू होत असल्याने पुढील दोन तासात गणगवळण, बतावणी, रंगबाजी व वगनाट्य कसे दाखवायचे असा प्रश्न तमाशा कलावंतांपुढे पडला आहे.

त्यामुळे मध्यरात्री दोन वाजेपर्यंत तमाशा चालू ठेवण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे अशी मागणी मोहित नारायणगावकर यांनी केली आहे. तमाशाची वेळ वाढवून दिल्यास तमाशाची तिकीट विक्री वाढण्यास मदत होणार आहे. तसेच तमाशासाठी चार ते पाच पोलिसांचा बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

गौतमी पाटील बरोबर तुलना
बदलत्या डिजिटल काळाबरोबर तमाशातील गाण्यांची व नृत्याची तुलना नृत्यांगण गौतमी पाटील बरोबर केली जात आहे. आजही तमाशा कलावंतांना मद्यपी व धांगडधिंगा करणार्‍यांचा सामना करावा लागत आहे.

राज्य शासनाकडून सन 2008 ते 2011 पर्यंत भाग भांडवलासाठी दोन लाख तर प्रयोगासाठी सहा लाखाचे अनुदान देण्यात आले. त्यानंतर आजतागायात अनुदान दिले नाही. शासनाने आठ महिने चालणार्‍या तमाशाफडलकांना सरसकट वीस लाखांचे अनुदान द्यावे तरच तमाशा कलावंतांना चांगले दिवस येतील. – मयूर महाजन, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, जळगाव