मासे पकडण्यासाठी गेलेल्या चुलत्या-पुतण्याचे 12 तासांनी सापडले मृतदेह

जामखेड – चौंडी येथील सीना नदीतील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या  चुलत्या पुतण्याचा तोल गेल्याने नदीच्या वाहत्या पाण्यात दोघेही  वाहुन गेले. पाण्याचा प्रवाह जास्त आसल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. तब्बल बारा तासांनी त्या दोघांचे मृतदेह आढळून आले.

यानंतर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. चोंडी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मागील पाच सहा दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे तालुक्यातील सर्व तलाव, नदी, नाले व बंधारे ओसांडून वहात आहेत. चौडीं येथून वाहणारी सीना नदीला देखील पुर आला होता. येथील के टी वेअर बंधारा ओव्हरफ्लो झाला असून मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चोंडी येथील तुषार गुलाबराव सोनवणे (वय २२) व त्याचे चुलते सतीश बुवाजी सोनवणे (वय ४३) व इतर एक असे तीघे जण मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यावर गेले होते.

चलते पुतणे हे या केटीवेअर बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला मासे पकडत होते तर तिसरा हा बंधाऱ्याच्या बाजुला बसला होता. याच दरम्यान पाण्याचा वेग जास्त असल्याने यामध्ये चुलता व पुतण्या हे पाण्यात पडुन वाहून गेले. ही घटना बाजुला उभ्या आसलेल्या दुसर्‍या मुलाने गावात जाऊन सांगितली.

घटनेची माहिती समजताच तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. यानंतर रात्री आंधार असल्याने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दोन जनरेटर आणून त्या प्रकाशात शोधमोहीम चालू ठेवली.

रात्री उशिरा पर्यंत या दोघांचा शोध लागला नाही. सकाळी पावणेसहाच्या सुमारास या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. दोघा चुलता पुतणे यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment