अमिरातीच्या दोन क्रिकेटपटूंवर 8 वर्षाची बंदी

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्‍सिंग केल्या प्रकरणी आयसीसीने संयुक्‍त अरब अमिरातीच्या महंमद नावेद व शैमान अन्वर या दोघांवर 8 वर्षाची बंदी घातली आहे. 

या दोघांवर मॅच फिक्‍सिंग केल्याचा आरोप झाला होता. दोघांनाही जानेवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. नावेद केवळ सलामीवीर फलंदाज नव्हे तर अमिरातीकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही आहे. त्याने संघाचे नेतृत्वही केले आहे.

2019 साली झालेल्या टी-20 पात्रता लढतीत नावेद व शैमान यांनी सामना फिक्‍स करण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांना आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. महंमद नावेद याआधी 2019 साली टी-10 लीग स्पर्धेत मॅच फिक्‍सिंग प्रकरणात दोषी आढळला होता. हे दोन्ही खेळाडू 8 वर्ष कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नाहीत.

फिक्‍सिंग सारख्या प्रकरणात सहभागी होणे हे देश, संघातील सहकारी आणि चाहते यांच्याशी केलेली प्रतारणाच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव असताना त्यांनी फिक्‍सिंग करणाऱ्यांपासून दूर रहायला पाहिजे होते. या कारवाईमुळे भविष्यात अन्य खेळाडूंनाही हा एक इशारा मिळेल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment