अकोल्यात करोनामुळे आणखी दोघांचा बळी

मुंबई : अकोला  शहरात करोनामुळेआणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. दोन रुग्णांचा १९ मे रोजी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३ जणांचे मृत्यू झाले आहेत.

शहरात शुक्रवारी आठ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३४९ वर पोहोचली. सध्या १२० करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण ९२ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ८४ अहवाल नकारात्मक, तर आठ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३४९ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील २३ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २०६ जणांनी करोनावर मात केली.

दरम्यान, १९ मे रोजी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते त्याच दिवशी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला. त्यातील एक रुग्ण ५० वर्षीय महिला असून, ती नायगाव येथील रहिवासी आहे, तर दुसरा मृत रुग्ण ५२ वर्षीय पुरुष असून, बाळापूर मार्ग अकोला येथील रहिवासी होते.

Leave a Comment