आणखी दोन भाषणांवरून मोदींना निवडणूक आयोगाकडून क्‍लीन चिट

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज आणखी दोन भाषणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्‍लीन चिट दिली. कर्नाटकच्या चित्रदुर्गमधील सभेत मोदींनी पुलवामाचा उल्लेख करत बालाकोट हवाई हल्ल्यातील हिरोंसाठी मतदान करावे अशी हाक दिली होती. तर, गुजरातच्याच्या अहमदाबाद येथील रॅली बाबत सुद्धा निवडणूक आयोगाने मोदींना क्लीन चिट दिली आहे. मोदींच्या भाषणांमधून निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला. आयोगाने आतापर्यंत मोदी यांच्याविरोधातील आचारसंहिता भंगाच्या सात तक्रारींवर निर्णय दिला आहे. त्या सर्व प्रकरणांत मोदींना क्‍लीन चिट देण्यात आली. याआधी महाराष्ट्रातील वर्धा, लातूर, नांदेड आणि राजस्थानमधील बाडमेर, उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील सभांमध्ये मोदींनी केलेल्या वक्तव्यांवरून निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांच्या त्या भाषणांची छाननी करून आयोगाने निर्णय दिले.

Leave a Comment