पुणे जिल्हा | पोल्ट्रीची भिंत अंगावर पडून दोघा शाळकरी मुलांचा मृत्यू

लोणी काळभोर, (वार्ताहर)- येथील पांडवदंड परीसरात मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या पोल्ट्रीची भिंत अंगावर पडून दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला. यश मयूर काळभोर (वय 14, रा. पांडवदंड, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) व प्रथमेश संदीप बोरुडे (वय 15, रा. मूळगाव श्रीरामपूर, जि. अहमदनगर) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

भिंत पडत असल्याची जाणीव होताच, भिंतीजवळ उभे असलेले यशचे वडील मयूर गजानन काळभोर व त्यांचा मित्र सुनील वसंत चव्हाण हे दोघेजण वेळीच बाजूला झाल्याने त्यांचे प्राण वाचले. ही दुर्देवी घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मयूर काळभोर यांची पांडवदंड परिसरात जुनी पोल्ट्री होती. ही पोल्ट्री साफ करण्याचे काम मागील दोन दिवसांपासून सुरु होते.

दोन दिवसांपूर्वी मयूर काळभोर यांनी पोल्ट्रीवरील पत्रे काढून ठेवले. तर आज (गुरुवार) सकाळपासूनच पोल्ट्रीमधील साहित्य व जागेची साफसफाई सुरु होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक भिंत कोसळली. भिंतीखाली दोन मुले अडकल्याचे लक्षात येताच, मयूर काळभोर व त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तत्काळ भिंत हटविण्याचे काम सुरु केले.

भिंतीखाली गाडल्या गेलेल्या वरील दोन्ही मुलांना तत्काळ लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच दोघांचेही निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या दुर्देवी घटनेत मृत्युमुखी पडलेला यश काळभोर हा कदमवाकवस्ती येथील टायग्रीस स्कूल या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. तर त्याचा मित्र प्रथमेश बोरुडे हा लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होता. दोन्ही शाळकरी मुलांचा मृत्यू, तोही बापाच्या डोळ्यादेखत झाल्याने लोणी काळभोर व परिसरात शोककळा पसरली आहे.