नगर | जातीवाचक शिवीगाळ करणार्याला दोन वर्षाची सक्तमजूरी

नगर, (प्रतिनिधी) – जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या तिघांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर.नाईकवाडे यांनी दोषी धरून दोन वर्ष सक्तमजुरी व १२ हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली.

उषाबाई मच्छिंद्र जाधव (वय ५७), कैलास मच्छिंद्र जाधव (वय ३८) व विजय मच्छिंद्र जाधव (वय ३१, तिघे रा. निमगाव वाघा ता. नगर) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. २ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादी सागर धोंडीराम केदार तसेच फिर्यादीचे वडिल जखमी धोंडीभाऊ गेणू केदार (दोघे रा. निमगाव वाघा) त्यांच्या घरासमोर असताना पैशाच्या वादातून उषाबाई, कैलास व विजय यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती.

याप्रकरणी सागर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास नगर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी केला व संशयित आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले.