‘४ जून नंतर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ नसून फक्त ‘नरेंद्र मोदी’ अशी ओळख असेल’ – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | Narendra Modi | Lok Sabha Election 2024 – भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (यूबीटी) यांच्या हिंदुत्वातील फरक स्पष्ट करताना, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे ‘की आमचे हिंदुत्व हे लोकांच्या घरातील चुली पेटवणारे हिंदुत्व आहे पण भाजपचे हिंदुत्व हे लोकांची घरे जाळणारे हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व घराघरात दिवे लावते, पण भाजपचे हिंदुत्व घरे जाळते’, असे ठाकरे यांनी येथील जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान न्यायव्यवस्थेवर दबाव आणत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, मोदी सरकारने भारतीय निवडणूक आयोगाचा वापरही आमच्या पक्षाविरोधात केला होता. आमचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह हिसकावले गेले. मोदींनी माझा पक्ष, माझे चिन्ह आणि माझी माणसे काढून घेतली, पण तरीही तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते का? असा सवाल त्यांनी केला.

देशात मुस्लिम लोकसंख्या वाढल्याचा दावा करणाऱ्या एका सरकारी अहवालाविषयी बोलताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे गेल्या दशकापासून या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी स्पष्ट केले पाहिजे की मुस्लिम लोकसंख्येतील ही वाढ हे त्यांचे यश आहे की अपयश आहे. मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीबद्दल मोदी सरकारचे कौतुक करावे की टीका करावी याबद्दल आपण सर्व संभ्रमात आहोत असे ते म्हणाले.

भाजप सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, केजरीवाल यांच्याकडून सर्व अधिकार हिसकावून घेतले गेले आहेत. मोदीजींचे हे नाटक ४ जूनपर्यंत चालेल, त्यानंतर नाही. ४ जून नंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून फक्त नरेंद्र मोदी म्हणून ओळखले जातील, असे ते म्हणाले.

मोदी सध्या काहीही वाट्टेल ते बोलत सुटले आहेत. अदानी आणि अंबानी यांनी राहुल गांधीना टेम्पो भरून काळा पैसा पाठवला असा आरोप मोदींनी अलिकडेच केला आहे. मग हे जर खरे असेल तर तुम्ही सरकार म्हणून काय केले, तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा असताना हे टेम्पो तुम्हाला का सापडले नाहीत असा सवालही ठाकरे यांनी केला.

पंतप्रधान म्हणून तुम्ही जी भाषा वापरत आहात ती पंतप्रधान पदाला शोभत नाही; तुमच्यामुळे देशाचे नाव खराब होत आहे. पंतप्रधान मोदी, कृपया शांत राहा. बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे तेल डोक्यावर लावा आणि कपाल भाती करा, माझ्या देशाला बिघडवण्याचे काम करू नका असे आवाहनही त्यांनी पंतप्रधानांना केले.