भारतीय विद्यार्थ्यांना UGC चा इशारा; पाकिस्तानातून शिक्षण घेतल्यास मिळणार नाही भारतात नोकरी

नवी दिल्ली – भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) यांनी भारतातील विद्यार्थ्यांना इशारा दिला आहे. जर विद्यार्थ्यांनी पाकिस्तानमधून शिक्षण घेतले तर त्यांना भारतात नोकरी मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. दोन्ही संस्थांनी जारी केलेल्या आवाहनात भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानातील कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेऊ नये, अन्यथा ते त्यांच्या देशात कोणत्याही नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी पात्र ठरणार नाहीत, असे म्हटले आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना चिनी संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणे टाळण्याचा इशारा देऊन एक महिन्याच्या आत UGC आणि AICTE ने संयुक्तपणे सल्ला दिला आहे. यामध्ये “सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.” कोणताही भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाचा परदेशी नागरिक (OIC) ज्याला पाकिस्तानमधील कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल, तो पाकिस्तानी प्रमाणपत्राच्या आधारे भारतात नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी पात्र ठरणार नाही.असे UGCने सांगितले आहे.

पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू होणार नाहीत

परदेशी नागरिक आणि त्यांची मुले, ज्यांनी पाकिस्तानात शिक्षण घेतले आहे आणि त्यांना नागरिकत्व दिले आहे, ते भारतात नोकरीसाठी पात्र असतील. ते गृह मंत्रालयाच्या सुरक्षा मंजुरीच्या अधीन राहून भारतात नोकरी मिळविण्यास पात्र असतील.’ एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांच्या मते, भारतीय विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी कोणत्या संस्था आणि देशांना भेटी द्याव्यात, याचा सल्ला देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहेत.

यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले, देशाबाहेर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या हितासाठी UGC आणि AICTE अशा सार्वजनिक सूचना जारी करतात. ते म्हणाले, अलीकडच्या काळात आम्ही पाहिले आहे की आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी परदेशात परत जाता येत नसल्याने त्यांना कशा अडचणींचा सामना करावा लागला.