75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार

नवी दिल्ली – 75 व्या स्वातंत्र्यदिनी 75 कोटी लोक सूर्यनमस्कार करणार आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्र लिहून 75 व्या स्वातंत्र्यदिनी सूर्यनमस्कार घालण्यास सांगितले आहे.

UGC सचिव रजनीश जैन यांनी देशातील 1,000 हून अधिक विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि 40,000 हून अधिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होणार्‍या 75 कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले आहे. रजनीश जैन यांच्या पत्रात असेही म्हटले आहे की, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट सुमारे 30,000 महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या 3 लाख विद्यार्थ्यांद्वारे 75 कोटी सूर्यनमस्कार करवायचे आहेत.

पत्रात 1 जानेवारी 2022 ते 7 फेब्रुवारी 2022 या कालावधीत चालणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच या उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी सर्व संस्थांना सांगण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 51 दिवसांच्या कालावधीत सुमारे 21 दिवस सूर्यनमस्कार करावे लागतील. 21 दिवस दररोज 13 सूर्यनमस्कार करावे लागतील असे सांगण्यात आले आहे.

याशिवाय 21 दिवसांच्या या कार्यक्रमासाठी दररोज एक मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच सहभागी विद्यार्थी आणि संस्थांना 75 कोटी सूर्यनमस्कार कार्यक्रमासाठी तयार केलेल्या वेबसाइटवर नोंदणी करण्यास सांगितले आहे. सहभागी विद्यार्थी या उपक्रमात एकटे किंवा गटासह सहभागी होऊ शकतात, असेही यात सांगण्यात आले.

मात्र, यूजीसीच्या या आदेशाला अनेक शिक्षणतज्ज्ञांनी विरोधही केला आहे. टेलीग्राफच्या अहवालानुसार, अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजेन हर्षे म्हणाले की, यूजीसीची भूमिका शैक्षणिक मानकांचे पालन करणे आणि राखणे ही आहे, विशिष्ट प्रसंगी कार्यक्रम साजरे करण्यासाठी सूचना जारी करणे नाही. यूजीसीचा हा आदेश शैक्षणिक स्वातंत्र्य आणि उच्च शिक्षणाच्या विरोधात असल्याचेही म्हंटले आहे.