Russia-Ukraine war : रशियाचे लढाऊ विमान उडवल्याचा युक्रेनचा दावा

किव्ह – रशियाचे अत्याधुनिक लढाऊ विमान उडवल्याचा दावा युक्रेनने केला आहे.आपल्या सैन्याने फ्रंट लाइन्सपासून सुमारे ६०० किलोमीटर अंतरावरच्या हवाई तळावर तैनात असलेल्या एका अल्ट्रा-आधुनिक रशियन युद्धविमानाला लक्ष्य करण्यात आले, असे युक्रेनने रविवारी सांगितले. युक्रेनच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी युक्रेनला रशियाच्या आत मर्यादित हल्ल्यांसाठी त्यांची शस्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर युक्रेनने ही कारवाई केली आहे.

हवाई तळावरच्या या कारवाईचे उपग्रहाच्या माध्यमातून प्राप्त झालेले फोटो युक्रेनच्या गुप्तचरांनी प्रसिद्ध केले आहेत. रशियाच्या सुखोई-५७ लढाऊ विमानावर युक्रेनचे पहिले ज्ञात यशस्वी मारा यामुळे सिद्ध होतो, असे युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे. नष्ट करण्यात आलेले विमान हे रशियाचे सर्वात प्रगत लष्करी आणि ट्विन-इंजिन स्टिल्थ फायटर विमान म्हणून ओळखले जात होते.

हा हल्ला दक्षिण रशियातील अख्तुबिंस्क तळावर शनिवारी केला गेला. हा तळ फ्रंट लाइनपासून सुमारे ५८९ किलोमीटर अंतरावर आहे, असे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाने म्हटले आहे. मात्र या हल्ल्यासाठी युक्रेनने कोणती शस्त्रे वापरली हे त्वरित स्पष्ट झाले नाही, परंतु युक्रेनपासून या हवाई तळापर्यंतचे अंतर बघता एखाद्या ड्रोनच्या आधारे हल्ला केला गेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

अमेरिका आणि जर्मनीने अलीकडेच युक्रेनला पुरवत असलेल्या लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर रशियाच्या भूमीवरील काही लक्ष्यांवर मारा करण्यास परवानगी दिल्यानंतर हा हल्ला केला गेला आहे.

बायडेन यांनी नव्याने मंजूर केलेल्या मार्गदर्शनाखाली रशियाच्या आत हल्ला करण्यासाठी युक्रेनने यापूर्वीच अमेरिकेची शस्त्रे वापरली आहेत. युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किवचे रक्षण करण्याच्या मर्यादित हेतूसाठी अमेरिकन शस्त्रे वापरण्याची परवानगी पहिल्यांदा देण्यात आली होती. मात्र नंतर रशियाच्या रहिवासी भागात मारा न करण्याची अट युक्रेनला घातली गेली होती.