उमरान, अर्शदीपची भारतीय संघात अपेक्षित निवड; आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे आयपीएल स्पर्धेत आपल्या वेगाने सर्वांनाच चकित केलेला जम्मू काश्‍मिरचा नवोदित वेगवान गोलंदाज उमरान मलिक व पंजाबचा नवोदित वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

नियमित कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून लोकेश राहुलकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी अनुभवी फलंदाज चेतेश्‍वर पुजारा याला पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे.

येत्या 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाट टी-20 सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत असून या संघात यष्टीरक्षक फलंदाज दीनेश कार्तिक, हार्दीक पंड्या, हर्षल पटेल, आवेश खान यांच्यासह पुन्हा एकदा रवी बिष्णोई, दीपक हुडा, व्यंकटेश अय्यर यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादकडून 13 सामन्यांतून 21 बळी घेतलेल्या तसेच आपल्या प्रचंड वेगाने खेळाडूंसह ससगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्‍का देणाऱ्या उमरानला तसेच सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या अर्शदीप सिंगवर विश्‍वास दाखवताना निवड समितीने त्यांना संघात स्थान दिले आहे.

हार्दीक पंड्याने आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना तसेच सरस कामगिरी करत आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्याने त्यालाही संघात स्थान दिले गेले आहे. रोहित व कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व राहुलकडे सोपवण्यात आले आहे. आयपीएल स्पर्धेत अफलातून कामगिरी केलेल्या दीनेश कार्तिकला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी देतानाच ऋषभ पंतचेही स्थान कायम राखले आहे. तसेच संघाचे उपकर्णधारपदही त्याच्याकडे कायम ठेवले गेले आहे.

निवड समितीने आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठीही या संघात काही बदल होतील याची शक्‍यता फेटाळली असून खेळाडूंची कामगिरी तसेच दुखापती यांचे चित्र स्पष्ट झाल्यावर काही निर्णय घेतले जातील. त्याचबरोबर या दोन मालिकांनंतर भारतीय संघ गेल्या वर्षी रद्द झालेल्या कसोटी सामन्यासाठी तसेच मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळण्यासाठी रवाना होणार असून या संघात तंत्रशुद्ध अनुभवी फलंदाज चेतेश्‍वर पुजारा याला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे. पुजारा गेल्या काही महिन्यांपासून इंगलंडमध्ये काउंटी स्पर्धेत खेळत असून त्यात त्याने चार शतकेही फटकावलेली आहेत. त्यात एका द्विशतकी खेळीचाही समावेश आहे. तसेच टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आलेले कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली व सर्व प्रमुख खेळाडूंना कसोटी संघात स्थान मिळाले आहे.

टी-20 संघ ः लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार), दीनेश कार्तिक, हार्दीक पंड्या, व्यंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्‍सर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्‍वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

कसोटी संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), लेकेश राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्‍वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), के. एस. भरत (अतिरिक्‍त यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्‍विन, शार्दुल ठाकूर, महंमद शमी, जसप्रीत बुमराह, महंमद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.