माणुसकीचे विद्यापीठ डॉ. पतंगराव कदम

निसर्गाने मानवाला दिलेल्या सर्व क्षमतांचा वापर करून आयुष्यात भव्यदिव्य निर्माण करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींमध्ये डॉ. पतंगराव कदमसाहेबांचे नाव अग्रभागी राहील. पृथ्वीतलावर आपल्या पाऊलखुणा सोडून जायच्या असतील तर एक पुस्तक लिहावे; म्हणजेच आपला विचार मागे राहतो. साहेबांनी एक पुस्तक लिहिले नाही; तर अनेक पुस्तके लिहू शकतील अशी सशक्त पिढी निर्माण करणारे विद्यापीठच निर्माण केले. आज स्वत: पतंगराव कदम या असंख्यांच्या रुपाने पुढील कित्येक शतके सोबत असतील. भारती विद्यापीठाचा वटवृक्ष चिरकाल ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणार आहे.

आज त्यांचे स्मरण करताना आपल्या आयुष्यासाठी त्यांच्याकडून काय शिकता येईल, याची बेरीज करणे क्रमप्राप्त वाटते. साहेबांबरोबर काही काळ काम करता असताना हृदयापासून जाणवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वांच्या कामाच्या आहेत. या मोठ्या कामामागे त्यांचा सामाजिक उत्थानाचा विचार आपल्याला दिसतो.

मी व माझे कुटुंब यापुरते आयुष्य मर्यादित न ठेवता आपणही सामाजाचे काहीतरी देणे लागतो, हीच पहिली शिकवण साहेबांकडून मिळाली. साहेबांचा अत्यंत मोकळा स्वभाव लक्षणीय होता. मनात एक ओठावर एक अशा स्वरूपाचा व्यवहार त्यांनी कधीही केला नाही. कोणत्याही व्यवस्थापकासाठी हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे. जोपर्यंत कोणतीही संस्था आपली आहे आणि आपण त्यांच्यातील एक आहोत, हे त्या आस्थापनेत कार्य करणाऱ्या सामान्य सहकाऱ्यांना वाटत नाही; तोपर्यंत चौफेर प्रगती होणे अशक्‍य आहे.

पतंगराव कदमसाहेबांच्या भारती विद्यापीठात आयुष्यभर काम करणारा सेवक वर्ग आहे आणि विद्यापीठाच्या प्रगतीत त्याचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच एका छोट्या खोलीतून सुरू झालेला विद्यापीठाचा प्रवास आज सातासमुद्रापार जाऊन पोहोचला आहे.

माणसांवर मनापासून विश्‍वास ठेवण्याचा दुर्मिळ गुण, माणसे ओळखण्याची नजर साहेबांकडे होती. माणसे ओळखून त्यावर शंभर टक्के विश्‍वास ठेवण्याचा मनाचा मोठेपणा म्हणजे अफलातून कारकीर्द घडवण्याचा हुकमी फंडा. ज्यांना मनाचा मोठेपणा दाखवता येतो ते कालपटलावर आपले नाव सुवर्णाक्षराने कोरून जातात. एकदा जबाबदारी दिली, की त्या कामात कमी हस्तक्षेप आणि त्याचा परिणाम चांगलाच होणार ही मनाची उच्च भावना डॉ. पतंगराव कदमसाहेबांकडे होती. असे व्यक्तिमत्व एका दिवसात घडत नाही. त्यामागे फार मोठी तपश्‍चर्या असावी लागते. आपण विस्तवावरून चालताना आपल्यासोबत चालणाऱ्यांना त्याची धग लागणार नाही, ही काळजी घेणारे काळीज असावे लागते. साहेब आपल्या जयंतीच्या निमित्ताने आम्हाला आपल्या या गुणातील काही अंशांचे पाईक होता आले तर आमचे जीवन धन्य झाले असे म्हणता येईल.
– चंद्रशेखर वाघ, भारती विद्यापीठ, पुणे