कंगनाच्या वक्‍तव्याला अनावश्‍यक महत्त्व – शरद पवार

मुंबई  – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने केलेल्या वक्‍तव्याला अनावश्‍यक महत्त्व दिले जात असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केले. मात्र याप्रसंगी त्यांनी कंगना रणावतच्या नावाचा उल्लेख करणे टाळले. कंगनाच्या वक्‍तव्याला जनता गांभीर्याने घेत नाही. तसेच तिला या आठवड्यात मिळालेल्या धमक्‍यांनाही आपण गांभीर्याने घेत नसल्याचे पवार म्हणाले. 

मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरबरोबर केल्यामुळे कंगना रणावत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सिनेमातील माफियापेक्षाही मुंबई पोलिसांची आपल्याला भीती वाटत असल्याचेही ती म्हणाली होती. मात्र अशी वक्‍तव्ये करणाऱ्यांना आपण विनाकारण जास्त महत्त्व देत आहोत.

ही अशी वक्‍तव्ये केल्यामुळे लोकांवर मोठ्या प्रमाणात काय परिणाम होतो हे आपल्याला आगोदर पहावे लागेल. माझ्या मते अशा वक्‍तव्यांना लोक गांभीर्याने घेत नाहीत. लोकांना पोलिसांचे काम माहित असते. त्यामुळे कोणी एक व्यक्‍ती काय बोलते याकडे लक्ष देण्याची गरज देण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

आपल्याला धमक्‍यांचे फोन आल्याबद्दल नुकतेच आपल्याला समजले आहे. यापूर्वीही आपल्याला अशा धमक्‍या मिळाल्या होत्या. मात्र आपण त्याकडे विशेष गांभीर्याने बघत नसल्याचेही पवार यांनी सांगितले.

Leave a Comment