पुणे | पुणे बार असोसिएशनसाठी निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मतपत्रिका मिळण्यास विलंब, वकिलांमधील वादावादी, मतदानावेळी हुल्लडबाजी अशा अभूतपूर्व गोंधळात वकिलांची शिखर संघटना पुणे बार असोसिएशन निवडणुकीतील मतदान प्रक्रिया बुधवारी (दि. २१) पार पडली. असोसिएशनच्या ७ हजार ९२३ सभासदांपैकी ३ हजार ९४७ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीतील त्रृटींमुळे मतदान दोनदा पुढे ढकलल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदारांचा उत्साह कमी राहिल्याचे चित्र दिसून आले.

शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये सकाळी नऊच्या सुमारास मतदानास सुरवात झाली. दुपारनंतर मतदान करण्यास वकीलवर्गाने गर्दी केली होती. सकाळच्या टप्प्यात मतदान सुरळीत पार पडले. मात्र, दुपारनंतर मतपत्रिका मिळण्यास विलंब होत असल्याने गोंधळ निर्माण झाला.

मतदार यादीत वगळण्यात आलेले नाव, महिलांसाठी स्वतंत्र रांगेचा अभाव तसेच तासाभराच्या प्रतिक्षेनंतरही मतपत्रिका मिळत नसल्याने बहुतांश वकिलांनी नाराजी व्यक्त केली. यावरून वकिलांमध्ये वादावादी तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींशी हुज्जत घालण्याचा प्रयत्नही यावेळी झाला. मतदानावेळी हुल्लडबाजी करणार्‍या वकिलांना नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ वकिलांसह निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नाकीनऊ आले होते.

मतदानाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. सभागृहाच्या पटांगणात वकिलांना मतपत्रिका मिळण्यासाठी उशीर झाल्याने सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. असोसिएशच्या अध्यक्षपदासाठी दोन, उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी सात, सचिव पदाच्या दोन जागांसाठी सहा आणि ऑडिटरच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सर्वाधिक चुरस ही उपाध्यक्ष पदासाठी आहे. या जागेसाठी तब्बल सात उमेद्वार रिंगणात उभे आहेत. मतपत्रिकांची विभागणी करून रात्री मतमोजणी सुरू होऊन रात्री उशिरा निकाल लागणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी दादाभाऊ शेटे यांनी दिली.